Rahul Mehendale and Shweta Mehendale wedding anniversary: राहुल मेहेंदळे आणि श्वेता मेहेंदळे दोघेही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार आहेत. ते विविध भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकतात. श्वेता सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. राहुल व श्वेता दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता त्यांच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने राहुलने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“या प्रवासात आपलं छोटंसं जगही पूर्ण झालं”

श्वेताबरोबरचे काही खास फोटो राहुलने शेअर केले आहेत. यामध्ये त्यांच्या लग्नातीलही एक फोटो आहे. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “२३ वर्ष..एका सुंदर नात्याची सुरुवात झाली आणि बघता बघता आयुष्याचा एक सुंदर प्रवास घडत गेला.”

पुढे त्यांनी लिहिले, “या प्रवासात प्रेम आहे, मैत्री आहे, असंख्य आठवणी आहेत, थोडे रुसवे-फुगवे आहेत, मतभेद आहेत, संघर्ष आहेत… पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची साथ आहे. आपण एकत्र मोठे झालो, बदललो, शिकलो आणि आयुष्याला सामोरं जात राहिलो. कधी तू माझी ताकद झालीस, तर कधी मी तुझा आधार झालो. या प्रवासात आपलं छोटंसं जगही पूर्ण झालं.”

त्याने असेही लिहिले, “आज मागे वळून पाहताना जाणवतं की, आयुष्यात मिळालेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुझी साथ आहे. २३ वर्षांपूर्वी हातात घेतलेला तुझा हात आजही तितक्याच प्रेमाने धरून ठेवायचा आहे आणि पुढचा प्रवासही असाच एकत्र करायचा आहे.”

राहुलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “२३ वर्षांत तुमच्यात काहीही फरक पडला नाही. अजूनही तरूण दिसताय. हॅपी अॅनिव्हर्सरी”, दुसऱ्या एकाने लिहिले, “माझं आवडतं जोडपं”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जोडपे कायमच प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ते विविध गोष्टी शेअर करत असतात.