‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात यंदा सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड ‘सनई चौघडे’ने जिंकला आहे. याशिवाय जय-शर्वरीने ‘सर्वोत्कृष्ट जोडी’ हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, जय ‘Zee 5 मराठी सर्वोत्कृष्ट नायक’ सुद्धा ठरला आहे. एकंदर काय तर, जयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज हंचनाळेसाठी हा संपूर्ण सोहळा अविस्मरणीय ठरला आहे.

राजला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे, यामध्ये त्याने राणादाच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. यानंतर मध्यंतरीच्या काळात त्याने काही अन्य मालिकांमध्ये काम केलं आणि आता पुन्हा एकदा ‘सनई चौघडे’च्या निमित्ताने त्याने झी मराठी वाहिनीवर कमबॅक केलं. राज साकारत असलेल्या जयच्या ( शायनर ) भूमिकेला सध्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

राज हंचनाळे याबाबत भावना व्यक्त करत म्हणाला, “झी मराठी अवॉर्ड्सचा अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर होता. या सोहळ्यामुळे अनेक जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. झी मराठीसोबतचं माझं नातं खूप जुनं आहे. २०१६ पासूनच्या आठवणी आणि आजवरचा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोर आला. अशा मोठ्या सोहळ्याचा भाग होता येणं ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मुंबईतील एका १० बाय १०च्या खोलीत राहून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखं वाटलं.”

“मराठी मनोरंजनविश्वातील इतक्या दिग्गज कलाकारांसमोर सादरीकरण करणं हा खूपच उत्साहाचा अनुभव होता. मी या सोहळ्याचा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवला. या सोहळ्यातील माझ्यासाठी सगळ्यात खास क्षण म्हणजे ‘सनई चौघडे’ मालिकेला मिळालेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार. इतक्या दिवसांपासून संपूर्ण टीम घेत असलेल्या मेहनतीचं चीज झालं, असं वाटलं. याशिवाय शरूने स्टेजवर माझ्यासोबत केलेली गंमत आणि प्रँकही खूप मजेशीर होता. एकंदरीतच हा संपूर्ण सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.” असं राजने सांगितलं.