हल्ली सोशल मीडियाच्या काळात या माध्यमामुळे प्रेक्षकांना थेट त्यांच्या आवडत्या कलाकारांशी संपर्क साधणं अधीक सोप झालं आहे. ज्याचा अनेकदा कलाकारांना फायदा होतो आणि त्यांना त्यांच्या प्रेक्षकांची थेट प्रतिक्रिया कळते. परंतु, नाण्याच्या दोन बाजू असतात तशा याही गोष्टीचा काही वेळेला तोटा होऊ शकतो. अनेकदा यामार्फत कलाकारांना ट्रॉलिंग सारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो, तर कधी त्यांना नेटकऱ्यांचे विचित्र मॅसेजसुद्धा येतात असंच काहीसं घडलंय मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता राज मोरेबरोबर.
कलाकार त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांच्या कामाबद्दलची माहिती तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. राज मोरेही त्यापैकीच एक. राज मोरे हा मराठीतील देखना आणि अशा नवोदित अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा असून अनेकदा सोशल मीडियामार्फत चाहते त्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचवत असतात. परंतु, नुकतीच त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट घडल्याची त्याने यामार्फत फोटो शेअर करत सांगितली आहे.
अनेक अभिनेत्यांच्या फॉलोअरमध्ये महिला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. राजच्याही अनेक फीमेल फॉलोअर आहेत. या संदर्भातच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची चाहती कायम तिच्या प्रियकराची तुलना राजबरोबर करत असल्याचं म्हटलं आहे. राजने त्याला आलेल्या मॅसेजचा फोटो शेअर करत हा गमतीशीर किस्सा सांगितला आहे.
नेमकं काय घडलं?
राजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या एका चाहतीच्या प्रियकराने त्याला मॅसेज करत म्हटलं की, “हाय राज, माझ्या गर्लफ्रेंडला तू खूप आवडतोस आणि ती नेहमी तुझ्याबरोबर माझी तुलना करत असते. याचं मला खूप वाईट वाटतं त्यामुळे तू मला दहा हजार रुपये पाठव.” असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. यावर राजनेसुद्धा गमतीशीर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “कृपया मला तुझा यूपीआय पाठव”. यापुढे त्याने हसण्याचा इमोजी वापरला आहे.

दरम्यान, राजमोरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमधून तो घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने अभिनेता राकेश बापटच्या मुलाची भूमिका साकारली होती. यानंतर याच वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तो सध्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान व सुबोध भावे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
