Raj More shares Video: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. स्वानंदी, समर, अधिरा, मल्लिका काकू, रोहन, रोहनचे वडील, आनंद, निकिता, आजी, अंशुमन अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. मालिकेत सतत ट्विस्ट येतात, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.
मालिकेत स्वानंदी ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. तर सुबोध भावेने समर राजवाडे ही भूमिका साकारली आहे. रोहनच्या भूमिकेत अभिनेता राज मोरे आहे. रोहन व स्वानंदी या बहीण-भावाची जोडी प्रेक्षकांची मने जिंकते. दोघेही कुटुंबावर प्रेम करतात, त्यांच्या सुखासाठी काही कठोर निर्णय घेतात. मोठ्या बहिणीचे स्वानंदीचे लग्न व्हावे, यासाठी रोहनने अट ठेवली होती की तिचे लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही. त्यानंतर स्वानंदीने रोहनचे लग्न व्हावे म्हणून अधिराच्या भावाशी म्हणजेच समरशी लग्न केले.
प्रेक्षक वेळोवेळी त्यांचे कौतुक करत असतात. वीण दोघांतली ही तुटेना मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता रोहनची भूमिका साकारलेल्या राज मोरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे.
“एक साधा प्रवास, पण आयुष्यभर लक्षात…”
राज मोरेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लोकलमधून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्याच्या शेजारील व्यक्ती मोबाईलवर वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा एपिसोड पाहत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिले, “आयपीएल मॅच पाहायला चर्चगेटला जात होतो. एक साधा प्रवास, पण आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण मिळाला.”
पुढे त्याने लिहिले, “शेजारी बसलेला शांतपणे माझाच एपिसोड बघत होता आणि त्या क्षणी मनात एक वेगळीच भावना दाटून आली. अभिमान, आनंद आणि कृतज्ञता या सगळ्या भावना एकत्रच अनुभवयाला मिळाल्या. मनापासून खूप छान वाटलं. सांगावंसं वाटलं मीच रोहन आहे. पण कदाचित त्या क्षणाचं सौंदर्य तसंच शांत ठेवायचं होतं म्हणून शब्द ओठांवरच थांबले.”
शेवटी त्याने लिहिले, “आज जाणवलं. आपण जे स्वप्न बघतो, त्याला खरं रूप तुमच्या प्रेमामुळेच मिळतं. तुम्ही आहात म्हणूनच हे सगळं शक्य झालं आहे. तुम्हा सगळ्यांवर खूप खूप प्रेम आहे. असंच आमची मालिका बघत राहा आणि आमच्यावर असाच विश्वास ठेवत राहा.”
राज मोरेच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी राज मोरेच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत कौतुक केले आहे. तर, अनेकांनी तू त्या काकांना बोलायला हवं होतंस, त्यांना आनंद झाला असता, असे लिहिले आहे.
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
