छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. आजपासून या कार्यक्रमाचं तिसरं पर्व सुरू होत आहे. या कार्यक्रमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. या कार्यक्रमात येऊन राज ठाकरे यांनी विविध गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला.
राज ठाकरे यांनी या कार्यक्रमामध्ये स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य केलंच पण याचबरोबर त्यांना नेहमीच साथ करत आलेल्या त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबद्दलही ते भरभरून बोलले. काही वर्षांपूर्वी शर्मिला ठाकरे यांना त्यांचा पाळीव कुत्रा चावला होता आणि त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. याबद्दल राज ठाकरे
आणखी वाचा : “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं?” राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…
ते म्हणाले, “लग्नापूर्वी शर्मिलाला राजकारणाबद्दल काही माहिती नव्हतं. पण या क्षेत्रात काम करत असताना जे काही चढ-उतार आले त्यात तिने मला खूप चांगलं समजून घेतलं. तिच्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, तिच्या घरी लहानपणापासून कधीही कुत्रा नव्हता. पण ती आमच्या घरातल्या कुत्र्यांचं सगळं खूप प्रेमाने करते. मध्यंतरी आमचा कुत्रा बॉण्ड तिला चावला होता. शर्मिलाला येता-जाता त्याचे लाड करण्याची सवय. एकदा आमचा बॉण्ड झोपला होता आणि तिने सवयीप्रमाणे त्याचे लाड करायला गेली. ती त्याच्या जवळ जाताच त्याची झोपमोड झाली आणि तो तिला चावला.”
पुढे ते म्हणाले, “ते सगळं खूप भयंकर झालं होतं. तिच्या गालाच्या वरच्या बाजूला असणारं हाड बाहेर आलं होतं, गालावरची त्वचा संपूर्ण फाटली होती आणि दोन्ही ओठांचे साधारण सहा तुकडे झाले होते. माझी बाहेर प्रेस कॉन्फरन्स होती. ती चेहऱ्यावर हात धरून बेसिनपाशी आली. मला आधी कळलं नाही काय झालं. मी तिला विचारलं काय झालं आणि खाली पाहिलं तर सगळं रक्त होतं. तिला पाहिलं तर मला दिसलं की चेहरा फाटला होता. हिंदुजाला आमचे डॉक्टर होते त्यांनी लगेच टाके घातले आणि तिथेच प्लॅस्टिक सर्जरीही केली त्यामुळे ते सगळं निभावलं. एवढं सगळं झाल्यानंतरही ती हॉस्पिटलमधून घरी आली, बॉण्डला प्रेमाने जवळ घेतलं आणि मग खोलीत गेली.” राज ठाकरे यांचं हे बोलणं ऐकताना सर्वांच्याच अंगावर काटा आला होता.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.