प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा आज (२० मार्च) मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबईत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याबरोबर त्यांनी अभिनेता अंकुश चौधरीच्या निवडीचा एक किस्साही सांगितला.
आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर

“बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी हाक मारणाऱ्या लोकांपैकी एक शाहीर होते. शाहीरांचा प्रवास हा स्वातंत्र चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत असा आहे. जेव्हा मला केदारनं चित्रपटाबद्दल सांगितलं तेव्हा मला धाकधूक होती. मी त्याला प्रश्न विचारला की, शाहीरांचे काम कोण करणार? तर त्याने अंकुश चौधरी उत्तर दिलं.

त्यानंतर मी तो शाहीरांसारखा दिसेल का? असा प्रश्न त्याला विचारला. तर त्याने मला सांगितलं, तो त्यांच्या भूमिकेत शिरेल. मी आज चित्रपटाचा टीझर पाहिला आणि त्यावेळी मला दिसलं की अंकुश हा खरंच भूमिकेत शिरला आहेस”, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी अंकुश चौधरीचे कौतुक केले.

आणखी वाचा : “तुम्ही जे बोलता…” तेजस्विनी पंडितने नागराज मंजुळेंबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर आकाश ठोसरची प्रतिक्रिया

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. त्याबरोबर सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray talk about ankush chaudhari selected for maharashtra shaheer shahir sable character nrp
First published on: 20-03-2023 at 19:03 IST