रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत अनेक रेकॉर्ड्स देखील मोडले. थिएटर गाजवल्यावर काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आता या पाठोपाठ लवकरच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो पार पडेल. प्रेक्षकांना घरबसल्या टीव्हीवर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. टेलिव्हिजन प्रीमियरची रिलीज डेट स्वत: रितेशने जाहीर केली आहे.
‘शौर्य, संकल्प, स्वराज्य’ असं कॅप्शन देत ‘स्टार गोल्ड’ वाहिनीने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना येत्या १२ सप्टेंबरला रात्री ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर पाहता येईल. रितेश म्हणतो, “राजा शिवाजी’ हा आमचा सिनेमा टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय…१२ सप्टेंबर रात्री ८ वाजता तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. वर्ल्ड टीव्ही प्रीमियरमध्ये तुम्ही हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहू शकता. फक्त तुम्हाला रिमोटद्वारे भाषेचा पर्याय बदलावा लागेल.”
जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा ‘राजा शिवाजी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. याशिवाय ‘राजा शिवाजी’ सिनेमाला ‘बुक माय शो’ आणि ‘IMDb’ वर सुद्धा खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमाने केले ‘हे’ रेकॉर्ड्स :
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग वीकेंड
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक एका दिवसाची कमाई
- मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून, याची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. यामध्ये रितेश-जिनिलीयासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रितेशच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. रियान आणि राहील या दोघांनीही सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे. तर, बॉलीवूडचा स्टार अभिनेता सलमान खानने या सिनेमात कॅमिओ केला आहे.
