Rajeev Khandelwal Financial Secrets: २००३ मध्ये एकता कपूरच्या ‘कही तो होगा’ या मालिकेत राजीव खंडेलवालने मुख्य भूमिका साकारली. या मालिकेतूनच त्याला लोकप्रियता मिळाली. पण काही वर्षांतच त्याने ही मालिका सोडली होती. मात्र, त्याने साकारलेला ‘सुजल गरेवाल’ प्रेक्षकांना इतका आवडला होता की इतकी वर्षे उलटूनही आजही चाहते त्याला त्याच नावाने ओळखतात. इतकी लोकप्रियता मिळूनही राजीवने मोजक्याच प्रकल्पात काम केलं. प्रचंड प्रसिद्धी मिळूनही तो मोजक्याच प्रकल्पांमध्ये काम करणे का पसंत करतो? आणि त्याने इतकी संपत्ती कमावली आहे का, की तो आवडेल तेच काम करू शकतो, याबद्दल त्याला विचारण्यात आलं.
राजीव खंडेलवालने सांगितले तीन सिक्रेट्स
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना राजीवने तीन गुपितं सांगितली ज्यामुळे तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे. राजीव म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे, माणसाला असुरक्षित वाटण्याला किंवा जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या इच्छेला कोणतीही मर्यादा नसते. दुसरी गोष्ट, तुम्हाला नक्की किती पैसे कमवायचे आहेत हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही पैसे कमवत असता आणि तुम्ही अविवाहित असता, तेव्हा तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडं शहाणपणाने वागावं लागतं. मी त्या काळात माझ्या पैशांचा वापर अतिशय विचारपूर्वक केला होता,” असं त्याने भारती टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.
वर्षभरात राजीव खंडेलवालने घेतलेलं स्वतःचं घर
राजीव खंडेलवालने आठवण सांगितली की, जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा एका मित्राच्या १-बीएचके फ्लॅटमध्ये राहत होता. नंतर अवघ्या एका वर्षाने त्याने मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं. त्या घराची ५० टक्के रक्कम स्वतः भरली आणि उर्वरित रकमेसाठी गृहकर्ज घेतलं. “जेव्हा मी मुंबईला आलो, तेव्हा मी वर्षभर माझ्या एका मित्राबरोबर राहत होतो. त्याचं मी भाडं देत नव्हतो. त्यानंतर एकाच वर्षाने मी माझं स्वतःचं घर घेतलं.”
पार्ट्या केल्या नाही, ईएमआयवर वस्तू घेतल्या नाहीत-राजीव खंडेलवाल
तो पुढे म्हणाला, “मला कधीच गाड्यांची आवड नव्हती आणि मला पार्ट्या करायलाही आवडत नाही. अर्थात, मी काही पैसे खर्च केले, पण मी पुरेशी बचत होईल याची काळजी घेतली. माझ्या पहिल्या मालिकेपासूनच मला हे चांगलंच माहित होतं की जर माझ्याकडे पैसे नसतील तर समोर येईल ते काम मला स्वीकारावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे, मी कधीही हप्त्यांवर (EMI) वस्तू विकत घेतल्या नाहीत. असं अजिबात नाही नाही की मी काहीच हप्त्यांवर घेतलं नाही. मी घर घेतलं, तेव्हा ५० टक्के रक्कम भरली आणि उरलेल्या रकमेसाठी कर्ज घेतलं. ते कर्ज २० वर्षांसाठी होतं, तरी मला माहित होतं की मी ते ५ वर्षांत किंवा अगदी २ वर्षांतही फेडू शकेन.”
१८ महिने कामाविना गेले की काळजी वाटते
अशा प्रकारच्या आर्थिक नियोजनामुळेच राजीव खंडेलवालला आवडेल ते काम निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. “माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की मी ५ वर्षे काम न करताही राहू शकेन, असं अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा १८ महिने कामाविना उलटून जातात, तेव्हा मला थोडी काळजी वाटू लागते की मला माझ्या आवडीचं काम मिळत नाहीये; पण माझे नशीब चांगलंय की दर १८-२४ महिन्यांनी मला एखादा चांगला प्रकल्प मिळतोच,” असं राजीव खंडेलवालने नमूद केलं.
तीन मजली घरात राहतो राजीव खंडेलवाल
राजीवने त्याच्या गोव्यातील घराबद्दलही सांगितलं. जिथे तो स्वतः फळं आणि भाज्या पिकवतो आणि आपला रिकामा वेळ घालवतो. २०२४ मध्ये राजीवने मुंबईतील आपल्या घराची झलक दाखवली होती. तो एका प्रशस्त ३ मजली घरात राहतो. ‘ब्रुट इंडिया’शी बोलताना तो म्हणाला, “मी एका छोट्या शहरातून आलो आहे आणि छोट्या शहरातून आलेल्या लोकांची एक अडचण असते की, त्यांना राहण्यासाठी मोठी जागा हवी असते. आम्हाला मोठी जागा हवी होती आणि जेव्हा ही पाहिली तेव्हा मी जागेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतला.”
