Rajeev Khandelwal on Fitness: ‘कहीं तो होगा’, ‘हक से’, ‘रिपोर्टर्स’, ‘जजबात’, ‘शैतान’ अशा अनेक टीव्ही शोंमधून अभिनेता राजीव खंडेलवालला प्रसिद्धी मिळाली. आता मात्र अभिनेता त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या फिटनेसबद्दल वक्तव्य केले. तसेच जंक फूड खाण्याबद्दलही तो बोलला आहे.

राजीव खंडेलवालने नुकतीच भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तो आहाराबद्दल म्हणाला, “लोकांना वाटतं की मी स्वत:वर खूप नियंत्रण ठेवतो, पण तसे नाही; मला जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही. माझ्या जिभेला जंक फूडची चव माहीत नाही. जंक फूडबद्दल मला अजिबात आकर्षण वाटत नाही, त्यामुळे मी ते खात नाही.”

“आई लहानपणी मोड आलेली कडधान्ये…”

तो असेही म्हणाला, “स्वत:ला तंदुरूस्त ठेवावे लागते. मी अभिनेता आहे, म्हणून मी फिट आहे असे नाही. मी तंदुरूस्त आहे, कारण मला तसेच राहायला आवडते. अभिनेता होण्याआधीपासूच अगदी लहानपणापासून मी तंदुरुस्त आहे. आई लहानपणी मोड आलेली कडधान्ये, डाळ, आवळा खायला द्यायची; आता समजते की तशा पद्धतीचे जेवण ती का खाऊ घालत असे, त्यामुळे किती फरक पडतो, त्याचे किती फायदे आहेत हे आता समजते. त्या वयात आपल्याला जास्त समज नसते.”

अभिनेता पुढे म्हणाला, “आपल्याला वाटते की फळे ही मोठ्या माणसांसाठी असतात. मला वाटते की तुम्ही योग्य वयात योग्य आहार घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मी दररोज आवळा खायचो, झाडाची फळे तोडायचो आणि ती ताजी फळे खायचो. गोव्यातील माझ्या घरी मी ३३ वेगवेगळ्या पालेभाज्या, फळं, कडधान्ये पिकवतो.”

आहारात कोणते पदार्थ असतात? यावर तो म्हणाला, “मी शाकाहार करण्यास प्राधान्य देतो, लहानपणी मी कधीही मासांहार केला नाही; पण मुंबईत आल्यानंतर स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज वाटली, त्यामुळे मी मासांहार करण्यास सुरुवात केली. माझी पत्नी महाराष्ट्रातील आहे, ते मासे खाते, त्यामुळे मीसुद्धा मासे खायला सुरुवात केली. त्यामुळे मी मासांहार करतो, पण फार नाही. मुगाची डाळ, कोबीची भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा रोटी हा माझा आवडता आहार आहे. अगदी लहानपणापासून मला हेच खायला आवडते. माझ्यासाठी तो आदर्श आहार आहे. मांसाहार करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.”

राजीवप्रमाणेच अनेक कलाकार त्यांच्या आहाराबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल, ते काय व्यायाम करतात याबद्दल खुलेपणाने सांगतात. त्यांच्यासाठी कोणते व्यायाम, कोणत्या पद्धतीचा आहार फायदेशीर ठरला याबद्दल ते सांगतात. चाहतेदेखील त्यांच्या या जीवनशैलीबद्दल, त्यांच्या आहाराबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. मात्र, या सगळ्यात कलाकारांनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत गोष्टी आचरणात आणण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.