Rajesh Kumar on farming: ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत रत्ना पाठक शाह, सतीश शाह, रुपाली गांगुली, सुमीत राघवन, राजेश कुमार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेतील कलाकारांबद्दल आजही बोलले जाते.
या मालिकेतून लोकप्रिय ठरलेला कलाकार राजेश कुमारने काही वर्षांपूर्वी अभिनयातून ब्रेक घेतला आणि शेतीकडे वळला. त्याच्या या निर्णयाची मोठी चर्चा झाली होती. अभिनेता इंडस्ट्री सोडून बिहारमधील त्याच्या गावी परतला. त्याने सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. एक अॅप लॉन्च केले. मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकली.
राजेश कुमारवर होते २० कोटींचे कर्ज
राजेश कुमारने याआधी खुलासा केला होता की, त्याच्यावर २ कोटींचे कर्ज होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश आणखी एक खुलासा केला आहे. शेती करण्यासाठी फक्त त्यानेच अभिनय सोडला असे नाही. तर अमेरिका आणि फिनलंड या देशांत गेल्या २५ वर्षांपासून स्थायिक असलेल्या त्याच्या दोन बहिणींनीदेखील मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि त्याच्याबरोबर शेती करण्यासाठी त्या गावी परतल्या.
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश म्हणाला, “मी शेती करण्यास सुरुवात केली. कारण मला शेतीची आवड आहे. पण, माझ्या बहिणींनीदेखील शेती करण्यासाठी त्यांच्या नोकर्या सोडल्या. दोघी अमेरिका व फिनलंडच्या नागरिक आहेत. माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या दरम्यान माझ्या मोठ्या बहीणीने तिची नोकरी सोडली आणि भारतात आली. ती माझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. ती माझ्यासाठी वाढदिवसाची भेट होती. ती मला म्हणाली की तू अभिनयावर लक्ष दे. मी शेतीची कामे सांभाळेन. तिच्यानंतर माझ्या लहान बहिणीनेदेखील तिची नोकरी सोडली. मार्च महिन्यापासून तिने शेतीत काम करायला सुरुवात केली आहे.”
याच मुलाखतीत राजेशने शेतीचा विस्तार करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, असेही सांगितले. तो म्हणाला, “मी मित्रांना ताज्या भाज्या, फळे पोहोचवत असे. ते करताना मला २ कोटींचा तोटा झाला. पण, आता मी त्या आर्थिक संकटातून बाहेर आलो आहे. आता फक्त १० ते १५ टक्के कर्ज माझ्यावर आहे. साधारणपणे ते २० लाख इतके असेल. लवकरच, मी लोकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. ते शेतीशी संबंधितच असेल. पण, काहीतरी वेगळे असेल.”
याआधी राजेशने दैनिक भास्करला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो म्हणालेला की, मी २०१९ मध्ये पालघरमध्ये २० एकर जमीन भाड्याने घेतली होती. मात्र, त्यावर्षी पूर आला. त्या पुरात त्याने लावलेली १५ हजाराहून जास्त रोपे नष्ट झाली. त्याआधी त्या भागात कधीही पूर आला नव्हता. पण त्या वर्षीच्या मुसळधार पावसाने सगळं वाहून गेलं. ती सुरुवात खूप कठीण होती. पुढे आणखी तीन प्रयत्न केले, तेही अपयशी झाले. एक वेळ अशीही आली की मी माझ्या मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकायला सुरुवात केली. त्यावेळी खूप कर्ज झाले होते. ते शेत सोडावे लागले.”
अभिनेता असेही म्हणालेला, “एकदा मी इंग्लंडला शूटिंगसाठी गेलो होतो.तेव्हा माझ्या बँकेच्या खात्यात २५०० रुपये होते. त्या २४ दिवसांत मी दोनवेळा भारतात आलो आणि पुन्हा शूटिंगसाठी गेलो. पण, माझ्या मुलासाठी चॉकलेट आणू शकलो नाही.”
