ड्रामा क्वीन राखी सावंतने बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतल्यापासून काही ना काही गोंधळ सुरूच आहे. राखी आल्यानंतर शो रंजक झाला आहे. बिग बॉसचा आजचा एपिसोड फारच धमाकेदार असणार आहे. कारण दुखावलेली राखी सावंत आता तन्वीला नडून घरात राडा करणार आहे.

पहिल्या प्रोमोत राकेश बापट व तन्वी कोलतेचा डान्स दाखवण्यात आला. डान्स करताना राकेशने तन्वीच्या गालावर किस केलं. त्यावेळी राखी सावंतने डोळे बंद केले होते. त्यानंतर राकेशने राखीला चिडवायला तिच्यासमोर पुन्हा तन्वीला किस केलं. यानंतर राखी सावंत दुखावली. तिने चक्क स्वतःला शिक्षा दिली आणि स्वतःचे केस कात्रीने कापले.

आता नवीन प्रोमोत राखी अंड्यांसाठी तन्वी कोलतेशी भांडताना दिसतेय. राखी सावंतचे केस अर्धवट कापलेले व विचित्र दिसत आहेत. राखी सावंत तन्वीला अंडी मागते. पण तन्वी नकार देते. “जी अंडी मी काढली आहेत, ती शिक्षा म्हणून काढली आहे. अंडी गेली, तर गेली,” असं तन्वी कोलते म्हणते. त्यानंतर भडकलेली राखी सावंत ओरडत म्हणते, “मी ती अंडी बनवून लोकांना खाऊ घालणार.”

तन्वी पुढे राखीला म्हणते, “केसांबरोबर डोकं पण उडवून लावलं का?” यावर राखीचा पारा चढतो आणि “खून का बदला खून, अंडे का बदला अंडा” असं म्हणत अनुश्रीच्या हातातील अंड्याची ट्रे पाडते. यामुळे सगळी अंडी जमिनीवर पडतात आणि फुटतात.

पाहा प्रोमो

हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राखीने तन्वीचा चांगला माज उतरवला, तन्वी राखीबरोबर फुटेजसाठी जाणून असं वागतेय, राखीमुळे बिग बॉस पाहायला मज्जा येतेय, राखी अन्नाचा अपमान करतेय, राखी अन्न वाया घालवतेय, अशा कमेंट्स या प्रोमोवर आहेत.

Rakhi Sawant Tanvi Kolte Fight Bigg Boss Marathi 6
बिग बॉस मराठीच्या प्रोमोवरील कमेंट्स (फोटो- इन्स्टाग्राम)

राखीला बाथरूम वापरण्यास मनाई

दरम्यान, राखीने अंडी फोडल्यानंतर घरातील सर्वजण तिला बाथरूम वापरण्यास मनाई करणार आहेत. अनुश्री म्हणते की जोवर ती अंडी साफ करणार नाही, तोवर तिला बाथरूम वापरता येणार नाही. यावर राखी म्हणते की ठिक आहे, नाही वापरणार बाथरूम. मी एक आठवडा आंघोळही करणार नाही. जे हक्काचं आहे ते हक्काचं आहे असं राखी म्हणाली.

राकेश व तन्वीच्या डान्सनंतर राखीने केस कापून घरात गोंधळ केला. त्यानंतर राकेश व तन्वी एकमेकांशी बोलताना दिसले. आपल्या बहीण-भावाच्या जोडीवर किती लोक जळतात, असं तन्वी राकेशला म्हणते. त्यावर राकेश तिला म्हणतो की तू मला आरबी आरबी म्हण, दादा म्हणू नकोस. नाहीतर लोक म्हणतील भाऊ-बहीण म्हणतात आणि काय करतात. त्यावर तन्वी म्हणते की आपण भाऊ-बहीणच आहोत, पण आपल्याला परफॉर्म करायला सांगितलं तर आपल्यातील कलाकार जागा होणारच. राखी रागाने तन्वीकडे पाहत असते, त्यावर तन्वी कमेंट करते.