Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी ६’मधून गेल्या आठवड्यात राखी सावंत एव्हिक्ट झाली. या ड्रामा क्वीनचं एलिमिनेशन प्रत्येकासाठी धक्कादायक होतं. कारण, यावर्षी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच राखी सर्वत्र चर्चेत होती. मात्र, तिचा या शोमधील प्रवास १३ व्या आठवड्यात संपला. यामुळे राखीचे चाहते खूपच नाराज झाले होते पण, शोमधून जरी एलिमिनेट झाली असली तरी, राखी मात्र सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी प्रचंड उत्सुक आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा फिनाले येत्या रविवारी १९ एप्रिलला पार पडणार आहे. या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे या खास दिवशी राखी सुद्धा एका खास अंदाजात एन्ट्री घेणार आहे. फिनालेसाठी अभिनेत्रीने एक खास डिझायनर ड्रेस खरेदी केला आहे. हा ड्रेस घेण्यासाठी राखी खास दुबईला गेली होती, आणि या ड्रेसची किंमत आहे तब्बल १० लाख. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राखी यामध्ये सांगते, “मी आता दुबईमधल्या एका सगळ्यात भारी दुकानात आता आले आहे. इथे सगळे ड्रेस ८ ते १० लाखांचे आहेत. म्हणजे एका ड्रेसची किंमत १० लाखांपर्यंत आहे. यातलाच एक ड्रेस आहे जो १० लाखांचा आहे आणि तोच ड्रेस मी ‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेला घालणार आहे. असे मी १०-१२ लाखांचे चार-पाच ड्रेस खरेदी केले आहेत.”

राखीच्या ड्रेसची किंमत ऐकून नेटकरी थक्क झाले होते. यावरून ती ग्रँड फिनालेसाठी किती उत्सुक आहे हे सुद्धा प्रेक्षकांना समजलंय. राखीने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तिने एकूण ४-५ ड्रेस खरेदी केले आहेत. आता यापैकी राखी फिनालेला कोणता ड्रेस घालणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे टॉप ५ स्पर्धक कोण आहेत, त्याबद्दलची घोषणा सुद्धा आजच्या भागात करण्यात आली आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद या पाच जणांपैकी ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची ट्रॉफी कोण उंचावणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.