Deepali Sayyad on Rakhi Sawant Comment : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन नुकताच संपला. यंदाच्या सीझनची विजेती ठरली तन्वी कोलते. यंदाच्या सीझनमध्ये तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट आणि दिपाली सय्यद हे स्पर्धक टॉप-५ पर्यंत पोहोचले होते.

दिपाली सय्यद १०० दिवसांच्या प्रवासानंतर पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. या संवादात तिने राखीने राकेश आणि तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिले. नेमकं काय म्हणाली दिपाली सय्यद? चला जाणून घेऊ…

‘बिग बॉस’ मराठीमधील एका भागात राखी सावंतने “दिपालीचं लग्न झालेलं आहे; तरीही ती राकेशबरोबर अफेअर करते”, असं गंभीर वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर आता दिपालीने प्रतिक्रिया दिली आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिपाली म्हणाली, “राखी छान आणि गोड मुलगी आहे. ‘बिग बॉस’च्या घरातच मी तिला भेटले. ती माझ्या कुटुंबाला ओळखते तिच्या भावाबरोबर माझ्या पतीने काम केले आहे. सगळ्यांनाच ती ओळखते. सगळं काही माहीत असताना केवळ गेमसाठी एखाद्याला वाईट बोलणे मला आवडलं नाही. मी ‘बिग बॉस’च्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मानलं. त्यावेळी घरात मी राकेशबरोबर उभी आहे, त्याच्याबरोबरच बॉंडिंग सहन होत नाहीय म्हणून राखी खालच्या पातळीवर उतरली. ती जे जे बोलली, त्यापैकी खूप काही दाखवलंच नाही. ती खूप काही बोलली आहे. अशा गोष्टी ती बोललीय ते ऐकल्यानंतर असं वाटेल की, मी ते सहन कसं काय केलं?”

यानंतर ती म्हणाली, “माझ्या तोंडूनही एक अपशब्द निघाला. पण त्यावर मी तिची माफीसुद्धा मागितली. मला ते बोलायचं नव्हतं, पण राखी इतकं बोलली की, माझा संयम तुटला. तिने ते बोलायला नको होतं. माझा संसार मी २७ वर्षे टिकवला आहे. एखाद्या स्त्रीसाठी हे सोपं नाही. ती जे बोलली ते मला सहन झालं नाही.”

शेवटी तिने सांगितलं, “तिचं ते बोलणं मला खटकलं होतं. नंतर तिने माफी मागितली. पण तेही राकेश बोलला म्हणून… माझं म्हणणं होतं की तिने स्वत:हून यावं. एका स्त्रीने स्त्रीला ओळखलं पाहिजे. बाकी माझं काही म्हणणं नव्हतं. स्त्रीच स्त्रीचा आदर करू शकत नाही, तर बाकीच्या लोकांचं काय. आपणच एकमेकांना आदर दिला पाहिजे. तेच मला तिच्याकडून हवं होतं.”