Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 6 New Promo : बिग बॉस मराठी ६ मध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. यंदाच्या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत घरात आली असून पहिल्याच दिवशी ती सर्वांना नडणार असं दिसतंय. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आला आहे. या प्रोमोत राखी सावंत आल्यानंतर घरात काय घडतंय, ते पाहायला मिळतंय.
बिग बॉस मराठीचा मागचा आठवडा खूपच धक्कादायक ठरला. कारण घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला. बिग बॉसच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यानंतर वीकेंडला ओमकार राऊत एलिमिनेट झाला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर गेल्यानंतर रविवारी वाईल्ड कार्डची एंट्री झाली. ही स्पर्धक दुसरी- तिसरी कोणी नसून राखी सावंत होय.
प्रोमोच्या सुरुवातीला सागर कारंडे राखी सावंतला म्हणतो, “राखी तू मला सांगितलं नाहीस की कोणती ड्युटी करणार आहेस.” त्यावर “मी फक्त दोन ड्युटी करणार. जेवायची आणि झोपायची”, असं उत्तर राखीने दिलं. त्यानंतर अनुश्री राखीला म्हणाली, “मग तू माझ्याबरोबर जेवण बनव.” त्यावर मला शिकवू नका असं राखी सावंत म्हणते. “आता मी जशी सती सावित्री आहे, उद्यापासून मी गांधारी होणार आहे. एकेकाला बाहेर काढेन मी,” असं राखी सावंत म्हणाली.
पाहा बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो
दरम्यान, बिग बॉस मराठी ६ चा हा प्रोमो पाहून नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. आता येणार खरी मजा, राखी सावंत रॉक्स, अनुश्री, रुचिता आणि तन्वी काय कमी होत्या, त्यात हिला परत आणलं देवा, राखी सावंत आता घरामध्ये कल्ला करणार..100%, मी सर्व सदस्यांना सांगतोय, तिचा नाद करू नका, तुम्हाला डोकं फोडून घ्यायची पाळी येईल, राखीची एन्ट्री पाहून बिग बॉस फॅमिली शो वाटत नाही, राखी तूच आता याचा सगळ्यांचा घमंड मोड, आता काही खरं नाही, अशा कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.
राखी सावंतने बिग बॉस मराठीत एंट्री घेतल्यानंतर सर्व सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. आता बिग बॉसच्या घरात भागात पुढे काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

