Rakhi Sawant Entry in Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी ६ सुरू होऊन एक महिना झाला आहे. पाचव्या सीझनच्या प्रचंड यशानंतर सहावा सीझन कधी सुरू होणार, याची उत्सुकता होती. बिग बॉस हिंदी १९ संपल्यावर निर्मात्यांनी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची घोषणा केली आणि ११ जानेवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
खरं तर पाचवा सीझन तुफान गाजल्याने सहाव्या सीझनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. खुद्द रितेश देशमुखनेही “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…!” या टॅगलाइनने प्रमोशन केलं. पण प्रिमियरमध्ये स्पर्धक पाहून यंदाचा सीझन म्हणजे पाचव्या सीझनची कॉपी आहे, असं वाटून गेलं.
मागच्या वर्षी एक गायक होता, म्हणून यंदाच्या सीझनमध्येही एक गायिका, पाचव्या सीझनमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री होती म्हणून यंदाच्या सीझनमध्येही एक ज्येष्ठ अभिनेत्री, पाचव्या सीझनमध्ये एक बॉडी बिल्डर होता, तेच यंदाही केलं. मागच्या सीझनमध्ये एक विनोदवीर होता, त्याच धर्तीवर या सीझनमध्येही एक विनोदवीर घेतला आहे. मागच्या सीझनमध्ये बरेच इन्फ्लुएन्सर्स होते, त्याप्रमाणे यंदाही त्यांना घेण्यात आलं. पाचव्या सीझनचीच कॉपी करून सहावा सीझन आणला, पण तो तेवढा गाजत नाहीये हे मात्र नक्की. कारण हा सीझन गाजत असता तर कदाचित बऱ्या हिंदी व मराठी सीझनमध्ये येऊन गेलेल्या राखी सावंतला यंदा वाईल्ड कार्ड म्हणून आणायची गरज भासली नसती.
निर्मात्यांनी पाचव्या सीझनची पुरेपूर कॉपी केली, पण शोची वेळ मात्र बदलली. त्यातही हे सर्व स्पर्धक ज्या पद्धतीने गेम खेळतायत ते पाहून कधीकधी वाटतं शाळेतली मुलं भांडतायत. टास्क दिला की तो रद्द होईल असं खेळायचं. आरडा-ओरडा करायचा आणि एकमेकांना वाट्टेल तसं बोलायचं. टीव्हीवर खेळतोय, लोक पाहतायत, याचं भान स्पर्धकांना नाही. शिव्या देताना काही मर्यादाही ठेवली जात नाही.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रितेश स्पर्धकांवर कधीतरीच चिडायचा. पण यावेळी तर भाऊचा धक्कामध्ये भाऊची सगळी एनर्जी स्पर्धकांची शाळा घेण्यात जात आहे. मागच्या सीझनची क्रेझ फक्त सामान्य प्रेक्षकांमध्येच नव्हती, तर आधीच्या पर्वातील स्पर्धक व मराठी सेलिब्रिटी मोठ्या उत्साहाने हा शो पाहायचे. त्यावर पोस्ट करायचे, आपली मतं मांडायचे. पण यंदाच्या सीझनबद्दल त्यांच्यामध्येही उदासीनता असल्याचं चित्र आहे.
एकूणच काय तर जे खपतं, तसंच सगळं रिपीट करायचं यावर निर्मात्यांनी यंदा लक्ष दिलं. मागचा सीझन नक्कीच वाजला होता, पण यंदाचा सीझन उरलेल्या ७० दिवसांत गाजतो की नाही, ते कळेलच.
