Bigg Boss Marathi 6 Eviction : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. नुकताच या शोचा शेवटचा भाऊचा धक्का पार पडला. या १३ व्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. सध्या घरात असलेल्या एकूण सात स्पर्धकांपैकी या आठवड्यात पाच सदस्य नॉमिनेट होते. अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, राकेश बापट आणि राखी सावंत या सदस्यांचा यामध्ये समावेश होता.
तेराव्या आठवड्यात नॉमिनेट असलेले पाचही जण दमदार खेळत असल्याने यावेळी कोण बाहेर जाणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव आता समोर आलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून शेवटच्या आठवड्यात एलिमिनेट झालीये राखी सावंत. तिने या शोमध्ये ‘वाइल्ड कार्ड’ स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती. राखीने घरात प्रवेश घेतल्यापासून रोज नवनवीन ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. राखीने संपूर्ण घर डॉमिनेट केलं होतं. मुळात यापूर्वी तिने ‘बिग बॉस’चा हिंदी सीझन सुद्धा खेळून आली होती. त्यामुळे राखीला घरातील सदस्यांमध्ये भांडणं कशी लावून द्यायची, कोणत्या वेळेला काय भूमिका घेतली पाहिजे या सगळ्याचा अंदाज होता. त्यामुळेच वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊनही राखी सर्वांवर भारी पडली होती.
मात्र, प्रेक्षकांची मतं कमी पडल्यामुळे आता राखीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. आता शेवटच्या आठवड्यात कोण बाहेर जाणार याबद्दलची अधिकृत माहिती रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर देतील. मात्र, राखीच्या एव्हिक्शननंतर आता शोला यंदाचे टॉप-६ स्पर्धक मिळणार आहे. यादरम्यान, मिड वीक एलिमिनेशन होण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय, आज ( ११ एप्रिल ) पार पडणाऱ्या शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश देशमुख राखी सावंतची शाळा घेणार आहे. दिपालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तिच्या लग्नाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रितेश राखीला जाब विचारणार आहे.
दरम्यान, तन्वी कोलते यंदाच्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. तिने या आठवड्यात ‘तिकीट टू फिनाले’ जिंकलं होतं. आता ‘बिग बॉस मराठी’चा सहाव्या सीझनचा विजेता कोण होणार हे अगदी काही दिवसांत प्रेक्षकांसमोर स्पष्ट होईल.
