Rakhi Sawant on Raqesh Bapat: राखी सावंत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिची अनेक वक्तव्ये, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखी नुकतीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात राखी सावंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर राखी सावंतने अनेक वाद-विवाद केले. घरातील सदस्यांबरोबर भांडणे केली. सुरुवातीला काटा गँगबरोबर दिसली, त्यानंतर ती त्यांच्यापासून दूर झाल्याचे पाहायला मिळाले.
या सगळ्यात राखी सावंत व राकेश बापटच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. राखीने वेळोवेळी राकेशवर तिचे प्रेम असल्याचे सांगितले. त्याच्याबद्दल तिच्या मनात भावना असल्याचे सांगितले. मात्र, राकेशने त्याच्या मनात राखीबद्दल प्रेम नसल्याचे सांगितले, त्याच्याकडून फक्त मैत्री असल्याचे सांगितले.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही राखीने जवळजवळ सर्व मुलाखतींमध्ये राकेशवर तिचे एकतर्फी प्रेम असल्याचे सांगितले. त्याचे जरी प्रेम नसले तरी ती त्याच्या प्रेमात पडली असल्याचे तिने वक्तव्य केले. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राखीने राकेशबद्दल आणखी एक वक्तव्य केले आहे, तिचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.ॉ
“मला राकेश बापट आवडला…”
राखी म्हणाली, “मी कशी प्रेमात पडले हे मला खरंच माहीत नाही. आधी माझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे ना, त्यामुळे माझं फक्त शरीर जिवंत होतं, मनाने मी मेले होते. मला राकेश बापट आवडला, आम्ही खूप भांडलो, नाचलो, हसलोसुद्धा; त्याच्यातील मला काय आवडलं हे मलाच माहीत नाही.”
ती असेही म्हणाली, “एका ज्योतिषाने मला सांगितलेलं की एक घटस्फोट झालेला मुलगा तुझ्या आयुष्यात येणार आहे, तर मला माहीत नव्हतं की हाच येणार आहे. राकेशने मला सांगितलं की माझा घटस्फोट झाला आहे, शमिताबरोबरही तो नात्यात नाही. आता मी एकटाच आहे. सुरुवातीला एकटाच आहे असं म्हणाला. आमच्यात आणखी जवळीक निर्माण झाली, तेव्हा सांगितलं की त्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे. आता ती कोण आहे हे माहीत नाही. “
राखी असेही म्हणाली की, राकेशबद्दल माझ्या मनात भावना आहेत. आता मी त्याच्या नावावर आयुष्य काढणार आहे. दरम्यान, राकेश आता बिग बॉसच्या शोमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणती मुलगी आहे, याबद्दल खुलासा करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
