Rakhi Sawant On Anushri Mane: रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक त्याची वेगळी रणनीती घेऊन आलेला असतो. शोमध्ये काय करायचे आहे, काय वागायचे आहे, इतर सहस्पर्धकांबरोबर कसे नाते असेल, अशा अनेक गोष्टींचा विचार स्पर्धक करतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यानुसार सहस्पर्धक तसेच प्रेक्षक त्यांची मते तयार करतात.

सध्या ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व अंतिम टप्प्यात आहे. १९ एप्रिल २०२६ ला या शोचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. या पर्वात अनेक लोकप्रिय कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. शोच्या सुरुवातीला एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले, त्यानंतर चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. असे एकूण २१ स्पर्धक सहाव्या पर्वाचा भाग झाले.

रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये स्पर्धकांमध्ये मतभेद, भांडणे, मैत्री, शत्रुत्व सर्व काही पाहायला मिळाले. आता राखी सावंतने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विविध मुलाखतींमध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाबद्दल तिचे मत मांडले आहे. राकेश बापटवर तिचे एकतर्फी प्रेम असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, घरातील इतर स्पर्धकांच्या खेळाबद्दलही ती व्यक्त झाली आहे. राखी नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“अनुश्री खोटारडी आहे”

राखी सावंतने नुकताच ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. यावेळी तिने राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन यांच्या खेळाबद्दल वक्तव्य केले. राखीने अनुश्रीबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. ती म्हणाली, “अनुश्री खोटारडी आहे, मला तिचा गेमच आवडत नाही. पहिल्या दिवसापासून खरं बोललं पाहिजे. सुरुवातीला ती म्हणाली की मला काहीच येत नाही, आता सीझनच्या शेवटी स्वयंपाक करायला लागली, भांडी घासायला लागली; म्हणायचं म्हणून काहीही म्हणू नका.”

पुढे राखी म्हणाली, “मी बघा किती राडे करते, पण मी सगळी कामं करते. मला सगळं येतं. खोटं बोलायचं नाही”, असे म्हणत राखी सावंतने अनुश्री खोटारडी असल्याचे म्हटले.

तसेच राकेश बापटच्या प्रेमात पडल्याची कबुलीदेखील राखीने दिली. तिचे एकतर्फी प्रेम असल्याचे तिने स्पष्ट केले. याबरोबरच, विशाल जवळचा मित्र असल्याचे राखीने सांगितले.

दरम्यान, आता सोशल मीडियावर नेटकरी, कलाकार त्यांचे आवडते स्पर्धक जिंकावे यासाठी पोस्ट शेअर करत आहेत. अनेक कलाकार घरातील स्पर्धकांच्या खेळावर त्यांची मते व्यक्त करत आहेत. तसेच, चाहते त्यांचे आवडते स्पर्धक जिंकावे यासाठी इतरांना वोट करण्याचे आवाहन करत आहेत.