Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Swayamwar: बिग बॉसच्या घरात दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. भांडणे, वाद-विवाद, गटबाजी, आरोप-प्रत्यारोप यांमुळे बिग बॉस या शोमध्ये सतत ट्विस्ट येताना दिसतात. सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातदेखील सतत काही ना काही घडताना दिसते. घरामध्ये असलेल्या स्पर्धकांमध्ये मैत्री पाहायला मिळते, शत्रुत्व पाहायला मिळते आणि अनेकदा तिरस्कारही पाहायला मिळतो.
काही दिवसांपूर्वी एका टास्कदरम्यान राकेश बापट आणि तन्वी कोलते यांनी एकत्रित डान्स केला. या डान्सदरम्यान राकेशने तन्वीच्या गालावर किस केले होते. राकेशच्या या कृतीनंतर राखीने स्वत:च केस कापले होते. राखीच्या या वागण्याचा राकेशसह अनेकांना धक्का बसला होता. आता त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर राखीचे स्वयंवर लावण्यात येणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठी वाहिनीचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर आज नेमकं काय घडणार आहे, याची झलक पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात राखीचं स्वयंवर होणार
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की राखीच्या हातात दोन फुलांचे हार आहेत. रितेश राखीला विचारतो, “राखी हा हार तुम्ही कोणाच्या गळ्यात घालणार?” त्यानंतर राखी राकेशकडे बोट दाखवत त्याचे नाव घेते. त्यावर रितेश म्हणतो की जीत जरी तुमची असली तरी हार त्यांचीच आहे. त्यावर सगळे हसताना दिसतात.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते राकेश स्टेजकडे डान्स करत जातो. त्यानंतर राखी त्याच्या गळ्यात हार घालते. राकेशही राखीच्या गळ्यात हार घालतो. रितेश राखीला हसत विचारतो, “तुमची कपटी ननंद कोण आहे?”, त्यावर राखी तन्वीचे नाव घेते. त्यावरही सगळे हसताना दिसतात. पुढे सगळे स्पर्धक नाचत असल्याचेदेखील दिसतात.
रितेश पुढे म्हणतो की आता लग्नातील फॅमिली फोटो घेऊयात. त्यानंतर सगळे एकत्र येऊन फोटोसाठी पोज देतात. हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीने, “बिग बॉसच्या घरात राखीचं स्वयंवर रंगणार. वर म्हणून ती राकेशची निवड करणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “राखी आल्यापासून गालावर हसू आलं”, दुसऱ्या एकाने लिहिले, “काही करतात लग्न म्हणजे मस्करी आहे काय?”, एका नेटकऱ्याने लिहिले, “एकदम कडक”, अशा कमेंट्स केल्या आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तीन स्पर्धकांची वाईल्ड एन्ट्री होणार आहे. आता हे तीन स्पर्धक कोण असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
