अभिनेता राम कपूर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. व्यावसायिक आयुष्यासह तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अनेकदा त्याचे विचार, अनुभव, किस्सा तो मनमोकळेपणाने सांगत असतो. अनेकदा त्याने त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल सांगितलं आहे. अशातच आता राम कपूरने नुकताच खुलासा केला होता की, त्याच्या वागणुकीमुळे लोकप्रिय टीव्ही शो ‘बडे अच्छे लगते हैं’ संपुष्टात आला.

‘लॉक अप’मध्ये त्याने हा धक्कादायक खुलासा केला होता. आता त्याने आयुष्यातील त्या कठीण टप्प्याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे. शो सुरू अशताना तो प्रचंड काम करत होता, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत होता, नैराश्याचा सामना करत होता आणि अखेर मद्यपानाच्या आहारी गेला. असा खुलासा त्याने केला आहे.

राम कपूरने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

२०११ च्या आसपास आपण कोणत्या परिस्थितीतून जात होतो, याबद्दल बोलताना राम कपूरने नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “तो माझ्या टेलिव्हिजनवरील करिअरचा महत्त्वाचा काळ होता. बडे अच्छे लगते हैं हा त्यावेळचा सर्वात मोठा शो होता. त्या शोला आता १५ वर्षे झाली आहेत, तरी आजही लोक मला त्याच शोमुळे ओळखतात. त्या काळात माझं वजन खूप वाढलं होतं आणि माझी प्रकृतीही बिघडली होती. मी खूप जास्त काम करत होतो. महिन्यातील सलग २७ दिवस काम करायचो. माझी प्रकती खूपच खराब झाली होती. रक्तातील साखरेची समस्या होती, रक्तदाब वाढला होता. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, तुम्ही अशा पद्धतीने काम करत राहिलात तर फार काळ टिकणार नाही. तुम्हाला स्ट्रोक किंवा असंच काही गंभीर होऊ शकतं”.

राम कपूर पुढे म्हणाला, “मला माहीत होतं की मला कामाचा वेग कमी करण्याची गरज आहे, पण त्या वेळी ते शक्य नव्हतं. कारण मी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्या शोचा भाग होतो. मी कामाचा वेग कसा कमी करणार? इतके पैसे, प्रसिद्धी आणि संपूर्ण देशाचं मिळणारं प्रेम मी कसं सोडणार? ज्या दोन महिलांचा मी मनापासून आदर करतो, त्या एकता कपूर आणि साक्षी तंवर यांना मी कसं निराश करणार? आणि या परिस्थितीत काम करण्यासाठी कोणताही अभिनेता आसुसलेला नसेल का? त्यामुळे मी काम करतच राहिलो”.

शो सुरू ठेवण्यासाठी आणि सहकलाकार व निर्मातिला निराश न करण्यासाठी सतत स्वतःवर ताण घेत राहिल्याने अखेर त्याचा परिणाम राम कपूरच्या आरोग्यावर झाला. याबद्दल तो म्हणाला, “याचा माझ्यावर परिणाम होत आहे, हे मला जाणवलंच नाही. पण त्याचा परिणाम झाला. स्वतःला सावरण्यापूर्वी आयुष्याच्या तळाशी जावं लागतं आणि मला वाटतं, मीही त्या टप्प्यावर पोहोचलो होतो, पण आता मला आनंद आहे, कारण जे काही घडलं ते योग्यच घडलं. मी त्या प्रवासातून गेलो, याचा मला आता आनंद आहे. या सगळ्यातून मी खूप काही शिकलो आणि त्यानंतर माझ्या करिअरने ज्या प्रकारे आकार घेतला, त्याबद्दलही मी खूप आनंदी आहे. मला माझ्या प्रवासाबद्दल खूप समाधान आहे”.

अखेर ‘बडे अच्छे लगते हैं’ हा लोकप्रिय शो बंद झाला

याबद्दल राम कपूर म्हणाला, “शो बंद करावा लागल्यानंतर एकताला वाईट वाटलं आणि तिला मी निराश केल्याची भावना होती. मात्र, ती याबद्दल कधीही माध्यमांसमोर काही बोलली नाही. त्यावेळी मलाही माहीत होतं की, माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. मी खूप कठीण आणि आव्हानात्मक अशा परिस्थितीतून जात होतो आणि माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.”

राम कपूरने सांगितलं की, या व्यग्र आणि धावपळीच्या वेळापत्रकामुळे त्याची जीवनशैली पूर्णपणे विस्खळीत झाली होती. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही महिन्यातील २४ ते २७ दिवस काम करता आणि दिवसालाही १४ ते १६ तास काम करता, तेव्हा तुमची जीवनशैली खरोखरच आरोग्यासाठी धोकादायक बनते. तुम्ही चुकीचं खाता. रक्तातील साखरेची पातळी बिघडते. सगळंच चुकीचं होतं”. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमुळेही त्याला या सगळ्यातून बाहेर पडणं अधिक कठीण जात होतं. राम कपूर म्हणाला, “तुम्हाला याचीही जाणीव असते की तुमच्यावर तीन जणांची जबाबदारी आहे. तीन जणांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून आहे. माझी पत्नी आणि माझी मुलं. ते माझ्यावर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही सतत काम करत राहता आणि याचाही तुमच्यावर परिणाम होतो”. पण अखेर कुटुंबासाठी स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, “पण नंतर तुमच्या लक्षात येतं की, जर मला काही झालं तर त्यांच्याबरोबर मी नसेन. तुम्ही जे काही मनात दडवून ठेवता, ते कुणाला सांगताही येत नाही”.

मी खूप दारू प्यायला लागलो – राम कपूर

दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक तणावामुळे तसेच विस्कळीत जीवनशैलीमुळे राम कपूरला मद्यपानाची सवय लागली. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी मनात दडवून ठेवता, तेव्हा त्याचे तुमच्यावर परिणाम होतात. माझ्याबरोबरही तेच झालं. मी खूप दारू प्यायला लागलो. नैराश्य, मद्यपान आणि अशा अनेक गोष्टींमुळे मी स्वतःचंच एक खूप कुरूप रूप बनलो होतो. मी स्वतःला त्रास देण्याचा कधीही विचार करणारा व्यक्ती नाही. पण मी अशा टोकापर्यंत जाऊ शकतो, जिथे माझ्या काही सवयी आणि कृतींमुळे माझं नुकसान होऊ शकतं. पण शेवटी सगळं काही ठीक झालं”.