राम कपूर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. राम कपूर अनेकदा त्याच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. राम कपूरने नुकतच त्याच्या आयुष्यातील कठीण काळ, वडिलांचं आजारपण याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने वडिलांच्या निधनानंतर तो आनंदी होता असं म्हणत त्यामागचं कारण सांगितलं आहे.

वडिलांबरोबरचा तो काळ आठवताना राम कपूरने नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “त्या परिस्थितीतून मी जात होतो, तेव्हा बाबांबरोबर असताना मला हे करता येईल की नाही, याची कल्पनाही नव्हती. त्यांनी माझ्याकडून जी अपेक्षा केली होती, ती मी खरंच पूर्ण करू शकेन का, हे मला माहीत नव्हतं. पण कुठेतरी त्यांना विश्वास होता की राम हे करू शकेल. कदाचित या बाबतीतली माझी ताकद त्यांनी ओळखली होती. मात्र, त्यावेळी मला स्वतःलाच याची जाणीव नव्हती”.

वडिलांना कर्करोगाने त्रस्त होताना पाहणं त्याच्यासाठी किती कठीण होतं, याबद्दलही राम कपूरने सांगितलं. तो म्हणाला, “माझं संपूर्ण लक्ष त्या मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीकडे होतं. हे अजिबात सोप नव्हतं. कर्करोगाने जाणं खूप वेदनादायक असतं. हा अतिशय भयंकर आजार आहे. कधी ते प्रचंड वेदनेत असायचे, कधी त्यांना भास व्हायचे. या सगळ्याचा सामना मला करावा लागला”. राम कपूरने सांगितलं की, वडिलांच्या शेवटच्या काळात त्याला नेमकं काय करावं, याचा विचार करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. तो शेवटपर्यंत वडिलांसाठी जे आवश्यक होतं तेच करत राहिला.

तो म्हणाला,”माझ्याकडे याचा विचार करण्यासाठी प्रत्यक्षात वेळच नव्हता. वडील जिवंत असेपर्यंत मला त्यांच्यासाठी जे काही करणं गरजेचं होतं, तेच मी करत राहिलो. त्यांचं निधन झाल्यानंतर हळूहळू या सगळ्या अनुभवाची जाणीव होऊ लागली. नंतर मला जाणवलं की या अनुभवातून मी किती काही शिकलो. आणि माझ्याबरोबर घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ही एक होती, कारण मी माझ्या वडिलांना त्यांना जे खरंच हवं होतं ते करण्यासाठी मदत करू शकलो”.

वडिलांच्या निधनाचं दु:ख झालं नाही – राम कपूर

वडिलांच्या निधनानंतर राम कपूरचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. तो म्हणाला की, प्रत्येकजण आपण कधीच मरणार नाही अशा पद्धतीने जगतो. मात्र, मृत्यूबद्दल कुटुंबीयांशी चर्चा करणं, त्यासाठी नियोजन करणं, इच्छापत्र आणि संपत्तीबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे. वडिलांच्या अखेरच्या क्षणांबद्दल बोलताना राम कपूरने सांगितलं की, त्यांचा त्रास संपला याचा त्याला दिलासा मिळाला. अभिनेता म्हणाला, “त्यांच्या त्रास संपल्याचा मला खूप आनंद झाला. मला त्यांच्या मृत्यूचं दुःख नव्हे, तर एक प्रकारचा आनंद वाटत होता. मी मृत्यूकडे पाहून हसत होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मृत्यूकडे पाहून हसायला लागता, तेव्हा त्याची भीती कशी वाटणार? आता तर माझ्यासाठी मृत्यू हा एक विनोद झाला आहे.”

वडिलांसाठी त्यांच्या शेवटच्या काळात सतत सोबत राहण्याच्या निर्णयाचा त्याच्या कुटुंबावर भावनिक परिणाम झाला, हे राम कपूरने मान्य केलं. मात्र, आपल्या निर्णयाबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप नाही, असं त्याने स्पष्ट केलं. राम म्हणाला, “मी काही चुकीचं केलं, असं मला वाटत नाही. कारण मी एका मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीला मदत केली. त्यामुळे मला याचा अजिबात पश्चात्ताप नाही”. राम कपूरने काही दिवसांपूर्वी ‘लॉक अप सीझन २’मध्ये वडिलांच्या या इच्छेबद्दल सांगितलं होत. त्याच्या वडिलांनी कर्करोगाच्या त्रासमुळे आयुष्य संपवण्याची इच्छा व्यक्ती केली होती असं त्याने सांगितलेलं.

राम कपूरच्या वडिलांची आयुष्य संपवण्याची होती इच्छा

राम कपूर याबद्दल शोमध्ये म्हणालेला, “माझे वडील श्रीमंत उद्योगपती होते. मात्र, मला नेहमीच माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं. त्यांच्या कंपनीत काम करण्याऐवजी मी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्यात कधीच फारसं जुळलं नाही. आमच्यात नेहमी वाद व्हायचे. कर्करोग पुन्हा झाल्यानंतर ते सिंगापूरमध्ये होते. तो कोविडचा काळ होता आणि सर्वत्र लॉकडाऊन होतं. त्यांनी गौतमीला फोन करून सांगितलं, मला रामशी बोलायचं आहे. त्यानंतर आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. त्यांनी ठरवलं होतं की आता त्यांना या आजाराशी पुन्हा लढायचं नाही. त्यांना शांतपणे या जगाचा निरोप घ्यायचा होता. पण ते एकटे हे करू इच्छित नव्हते आणि इतर कुणालाही याची माहिती द्यायची नव्हती. काही कारणाने त्यांना वाटलं की त्यांना माझी गरज आहे. त्यांनी मला विचारलं, तू मला शांतपणे या जगाचा निरोप घेण्यासाठी मदत करशील का? हे ऐकून माझी प्रतिक्रिया कोणत्याही सामान्य व्यक्तीसारखीच होती. पण त्यांनी मला समजावून सांगितलं की, जर मी मदत केली नाही तर त्यांना एकट्यानेच मृत्यूला सामोरं जावं लागेल. त्यांनी मला दुसरा कोणताही पर्यायच दिला नाही”.

राम म्हणाला, “त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू नव्हते, हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यांना फक्त माझा हात हातात धरून शांतपणे या जगाचा निरोप घ्यायचा होता. मी त्यांना तसं वचन दिलं होतं. पण ते पाळण्याइतका मी खंबीर असेन की नाही, याची मला खात्री नव्हती. मात्र, कसं कोण जाणे, त्यांना विश्वास होता की राम हे करू शकतो. त्यांना मृत्यूची भीती नव्हती, पण एकटं मरण्याची भीती होती. माझ्या अंत्यसंस्कारावेळी कुणीही रडू नये. माझं निधन झालं तर त्याच दिवशी माझ्यावर अंत्यसंस्कार कर, अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांचा हात धरून राहिलो आणि त्यांना साथ दिली. माझी आई आणि बहीण आजही माझ्याशी बोलत नाहीत. याला पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण मला वाटतं, आई-वडिलांसाठी मुलाने केलेल्या सर्वात मोठ्या गोष्टींपैकी ही एक आहे”.