हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते राम कपूर ‘लॉक अप सीझन २’मधील त्यांच्या सहभागामुळे चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. अशातच आता त्यांनी लग्नापूर्वी त्यांचे अनेक अफेअर होते असं म्हटलं आहे. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

‘लॉक अप’च्या अलीकडील भागात अभिनेता राम कपूर यांनी लग्नाआधीच्या त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल खुलासा केला. लग्नापूर्वी आपले अनेक रिलेशनशिप्स होते, अशी कबुली देत त्यांनी स्वतःला ‘प्लेबॉय’ म्हटलं. तसंच, लग्नाआधी त्यांची जवळची मैत्रीण एकता कपूर यांनी त्यांच्या डेटिंगबाबत त्यांच्या पत्नी गौतमी कपूर यांना सावध करण्याचाही प्रयत्न केला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

राम कपूर यांचं प्रेमसंबंधांबद्दल वक्तव्य

एपिसोडदरम्यान स्पर्धक श्रेया कालराने राम कपूर यांना, “लग्नाआधी तुमचे किती अफेअर्स होते?” असा प्रश्न विचारला. त्यावर राम कपूर म्हणाले, “लग्नानंतर एकही नाही.” त्यानंतर लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांबद्दल विचारले असता त्यांनी, “लग्नाआधी? मी प्लेबॉय होतो,” अशी कबुली दिली. श्रेयाने नेमका आकडा विचारल्यावर ते हसत म्हणाले, “मोजता येणार नाही इतके.”

यावेळी राम कपूर यांनी ते आणि गौतमी कपूर यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता, त्या काळातील एक आठवणही सांगितली. राम कपूर यांच्या ‘प्लेबॉय’ प्रतिमेमुळे त्यांची जवळची मैत्रीण एकता कपूरल गौतमी यांच्याबद्दल काळजी वाटत होती. दोघे लग्न करणार असल्याचं कळल्यानंतर एकताने गौतमी यांना त्यांच्या भूतकाळातील डेटिंगबाबत सावध करण्याचाही प्रयत्न केला होता, असं राम यांनी सांगितलं.

राम कपूर म्हणाले, “ठीक आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो. गौतमी आणि मी लग्न करणार आहोत, हे सगळ्यांना कळलं तेव्हा माझी मैत्रीण एकता कपूर हिने गौतमीला फोन केला आणि म्हणाली, तू काय करतेयस? याचे इतके अफेअर्स झाले आहेत. तू नक्की काय करते आहेस? एकताला गौतमीची काळजी वाटत होती. आणि खरं सांगायचं तर एकताने जे केलं ते योग्यच होतं, कारण त्या काळात मी तसाच माणूस होतो.”

राम कपूर व त्यांची पत्नी गौतमी कपूर यांची २००० साली ‘घर एक मंदिर’ या टेलिव्हिजनवरील मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेट झालेली. त्यावेळी काम करताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी २००३मध्ये लग्न केलं. गेल्या २० वर्षांपासून दोघे एकमेकांबरोबर सुखाचा संसार करत असून दोघांना दोन मुलंसुद्धा आहेत.