Ram Kapoor on wife Gautami Kapoor First Divorce : अभिनेता राम कपूर सध्या नेटफ्लिक्सवरील ‘लॉकअप २’ या शोमध्ये दिसतोय. या शोमध्ये तो इतर स्पर्धकांशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही गोष्टी शेअर करताना पाहायला मिळतंय. राम कपूरबद्दल शोमध्ये काही वाद झाले की त्याची मराठमोळी पत्नी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतेय. राम कपूरची पत्नी गौतमी कपूर ही मराठी आहे. गौतमी कपूरचं लग्नापूर्वीचं नाव गौतमी गाडगीळ. गौतमीने पहिल्या घटस्फोटानंतर राम कपूरशी दुसरं लग्न केलं. गौतमीच्या घटस्फोटाबद्दल राम कपूरने शोमध्ये केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय.

“मी आणि गौतमी पती-पत्नी म्हणून खूप स्ट्राँग आहोत. खरं तर जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा बॉयफ्रेंड किंवा क्रश येतो, तेव्हा तुम्ही तुमची सर्वात चांगली बाजू त्याला दाखवता, बरोबर ना? पण मी माझी सर्वात वाईट बाजू दाखवली. मी तिला माझ्याबद्दलच्या सर्व वाईट गोष्टी सांगितल्या, पण तरीही ती मला पसंत करू लागली,” असं राम कपूरने आकांक्षा चमोला आणि पामेला सेरेनाला सांगितलं.

गौतमीचं पहिलं लग्न अडीच वर्षे टिकलं- राम कपूर

राम व गौतमीची पहिली भेट २००० मध्ये ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यावेळी गौतमी विवाहित होती आणि तिच्या पहिल्या लग्नात खूश नव्हती, असं रामने सांगितलं. “हळूहळू मला समजलं की ती तिच्या पहिल्या लग्नात खूश नाही. तिचं पहिलं लग्न अडीच वर्षे टिकलं, पण त्या काळात ते दोघे वेगळे राहत होते. दरम्यानच्या काळात आमची मैत्री खूप वाढली होती. मला ती आवडू लागली होती, त्यामुळे मी तिला बरेच प्रश्न विचारायचो आणि ती मला उत्तरं द्यायची,” असं राम कपूर म्हणाला.

गौतमीने पहिला पती मधुर श्रॉफला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला

गौतमीच्या घटस्फोटाबद्दल राम कपूर म्हणाला, “मला समजलं की तिला घटस्फोट हवा होता, पण तिला तिचे कुटुंबीय पाठिंबा देत नव्हते. ते तिला घटस्फोट घेऊच नको, असं सांगत होते.” मात्र नंतर गौतमीने हिंमत केली. तिने पहिला पती मधुर श्रॉफला घटस्फोट देण्याचा धाडसी निर्णय घेतला, तेव्हा रामने तिला कायम तिच्याबरोबर असल्याचं सांगत धीर दिला. “गौतमीने हा निर्णय घेतल्यावर मी तिला म्हटलं की तिला कशीचीही गरज असेल तर मी कायम तिच्यासाठी हजर असेन. त्याच काळात आमची खूप घट्ट मैत्री झाली,” असं राम कपूरने नमूद केलं.

राम कपूरला जेव्हा झाली प्रेमाची जाणीव…

राम कपूरने कबुली दिली की त्याला ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गौतमीची आठवण येऊ लागली आणि प्रेमाची जाणीव झाली. राम कपूर म्हणाला, “मी दिल्लीत ‘मान्सून वेडिंग’चे शूटिंग करत होतो आणि आम्ही रात्री फोनवर बोलायचो. आमचं बराच वेळ बोलणं झालं. फोन ठेवल्यानंतर मला जाणवलं की मला तिची आठवण येतेय. मी घाबरलो, कारण ती खूप चांगली मुलगी होती. पुढे मी तिच्यापासून थोडं अंतर ठेवू लागलो. पण हे तिच्या लक्षात आलं आणि ‘काय चाललंय?’ असं तिने मला विचारलं.”

गौतमीला देखील राम आवडत होता. पण तीही भावना व्यक्त करायला घाबरत होती. “गौतमीला तिच्याबरोबर जे घडलं, त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. गौतमीचा पहिला पती एक चांगला माणूस आहे. त्याने काहीही चुकीचं केलं नाही,” असंही राम कपूरने स्पष्ट केलं.

दरम्यान, गौतमी व राम यांनी दोन वर्षे एकमेकंना डेट केलं. पण त्यांच्या लग्नाला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. कुटुंबियांचा विरोध पत्करुन त्यांनी १४ फेब्रुवारी २००३ रोजी अगदी साधेपणाने लग्न केलं. या जोडप्याला सिया व अक्स अशी दोन अपत्ये आहेत.