Ram Kapoor Prison Secret India USA Jail: राम कपूर हा मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकत्याच त्याने एकता कपूरच्या नेटफ्लिक्सवरील लॉक अप या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता राम कपूरने तो दोन देशांच्या तुरुंगामध्ये होता, असे सांगितले आहे.

नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत राम कपूरने सिनेविश्वातील आणि त्याच्या आयुष्यातील अनेक निगडित गोष्टींवर खुलासा केला आहे. ‘लॉक अप’मध्ये न सांगितलेले गुपित त्याने आता उघड केले आहे. राम कपूर हा तुरुंगामध्ये राहिला होता. त्याने भारतात आणि अमेरिकेत जेलमध्ये गेल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यावेळी वडिलांनी त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कोणतीही मदत न केल्याचे रामने सांगितले आहे.

काय म्हणाला राम कपूर?

जेलमध्ये जाण्याबाबत राम म्हणाला, “मी आतापर्यंत दोन देशांच्या तुरुंगात गेलो आहे. एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे अमेरिका. दोन्ही ठिकाणी मी फक्त एक एकच रात्र तुरुंगात घालवली. कॉलेजच्या दिवसांमध्ये आपण अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करतो आणि कधी कधी त्या करताना पकडलं गेलं, तर घरी जाण्याची परवानगी मिळेपर्यंत एक रात्र तुरुंगात घालवावी लागते.”

तुरुंगामध्ये जावे लागल्याबद्दल घरच्यांची किंवा वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर राम म्हणाला, “मी जेलमध्ये असताना माझे वडील मला सोडवण्यासाठी आले नव्हते. बाहेर कसे पडायचे याबद्दल मला माझं स्वतःचं पाहावं लागलं. त्या काळामध्ये माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते. कारण- मला अभिनेता व्हायचे होते म्हणून मी त्यांना आणि त्यांच्या कंपनीला सोडून पळून गेलो होतो.”

राम कपूरने स्वतःच्याच वडिलांच्या मृत्यूबाबत सांगितले. तो म्हणाला, “माझ्या वडिलांना वयाच्या ६३ व्या वर्षी पॅन्क्रियाटिक कॅन्सरचे (स्वादुपिंडाचा कर्करोग) निदान झाले होते. शस्त्रक्रिया शक्य नसल्याने त्यांच्यावर १८ वेळा केमोथेरपी करण्यात आली; पण नंतर पुन्हा त्यांचा कर्करोग उद्भवला होता. त्यामुळे वडिलांनी कपूरला, ‘तू मला शांतपणे या जगाचा निरोप घेण्यासाठी मदत करशील का?’ असा प्रश्न विचारला होता.”