Ram Kapoor Finance Tips: लोकप्रिय टेलिव्हिजन आणि बॉलीवूड अभिनेता राम कपूर सध्या पडद्यावर फारसा सक्रिय नसला तरी तो कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. राम कपूरने त्याच्या अफाट संपत्तीचे आणि गुंतवणुकीचे गुपित उघड केले आहे. माझ्या पुढच्या चार पिढ्या बसून खातील इतका पैसा कमावला आहे, असं राम कपूरने सांगितलं. तसेच फक्त पैसे कमावणं पुरेसं नसतं, तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दुबईत स्वतःची मालमत्ता, फेरारी आणि पोर्श सारख्या महागड्या कार कलेक्शन असणाऱ्या राम कपूरने सांगितले की, बँकेत पैसे ठेवून काहीच फायदा होत नाही, डोकं लावून गुंतवणूक केल्यास दर तीन वर्षांनी पैसे दुप्पट करता येतात.

राम कपूरने भारती सिंग व हर्ष लिंबाचियाला दिलेल्या मुलाखतीत गुंतवणूक आणि संपत्तीबद्दल सांगितलं. राम कपूर हा अनिल बिली कपूर यांचा मुलगा आहे. त्यांचं जाहिरात क्षेत्रात मोठं नाव होतं. रामच्या मते, बँकेत पैसे ठेऊन काहीच फायदा नाही. योग्य वेळी योग्य गुंतवणूक करण्याला महत्त्व आहे, यावर त्याने भर दिला. अभिनय करून खूप पैसा कमावला असला तरी अभिनय आवडतो म्हणून काम करत असल्याचं राम कपूरने नमूद केलं.

गुंतवणूक श्रीमंत बनवते- राम कपूर

राम कपूरने एकेकाळी पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत केली होती, आता मात्र तो फार काम करत नाही, तरीही लक्झरी आयुष्य जगतो. “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी पैशांसाठी खूप कष्ट करायचो. एकदा पैसे कमावल्यावर मग मी ते काम आवडतं म्हणून करू लागलो. आता तर मी फक्त जेव्हा मला काम करावं वाटतं तेव्हाच काम करतो, नाहीतर सलग सहा महिने मी काहीही करत नाही. या काळात, मी गुंतवणूक आणि मालमत्तेसंदर्भातील कामं करतो. दुबईमध्ये माझी मालमत्ता आहे. गुंतवणूक तुम्हाला जास्तीत जास्त श्रीमंत बनवते. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करता आणि तुम्ही त्याबद्दल सेन्सिबल असता तेव्हा तुम्हाला त्या पैशांचं काय करायचंय, हे माहीत असायला पाहिजे; कारण ते खूप महत्वाचं आहे,” असं राम कपूर म्हणाला.

गुंतवणुकीसाठी नीट डोकं लावा, ३ वर्षांत दुप्पट होतील पैसे- राम कपूर

गुंतवणूक करून गुंतवलेल्या पैशांत वाढ करण्याचं महत्त्व राम कपूरने सांगितलं. “जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर तुमच्याकडे इतके पैसे असतील ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. त्यासाठी तुम्ही नीट डोकं लावायला हवं. तसेच तुम्हाला सल्ला देणारे योग्य लोक चांगले असले पाहिजेत. पैसे कमवणे हा फक्त पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा म्हणजे तुम्ही त्या पैशाचे काय करता? बँकेत पैसे ठेवून काहीच फायदा नसतो, तुम्हाला त्याचं काय करायचंय हे माहित असलं पाहिजे. ते माहीत असेल तर तुम्ही दर तीन वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट करू शकता,” असं राम कपूर म्हणाला.

आपल्या पुढच्या चार पिढ्या आरामात जगू शकतील, इतके पैसे कमावले आहेत, असं ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना राम कपूरने सांगितलं. “घड्याळे आणि कार या गोष्टी मला खूप आवडतात. ज्या लोकांना ही घड्याळे परवडतात त्यांच्याकडे घड्याळांचं उत्तम कलेक्शन असतं. मला माझ्या घडाळ्यांबद्दल फार बोलायला आवडत नाही, पण मी सेलिब्रिटी असल्याने मीडियाला त्याबद्दल समजतंच. हो, माझ्याकडे कारचे कलेक्शन आहे. माझ्याकडे फेरारी, पोर्श या गाड्या आहेत, पण मी शो ऑफ करत नाही,” असं राम कपूरने सांगितलं.