Ram Kapoor and Gautami Kapoor Love Story: छोट्या पडद्यावरील ‘घर एक मंदिर’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली दीर-वहिनीची जोडी म्हणजे राम कपूर आणि गौतमी कपूर. आज ही जोडी सुखी वैवाहिक आयुष्य जगत असली तरी, गौतमीचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. राम कपूरच्या आयुष्यात येण्यापूर्वी गौतमीचे पहिले लग्न मोडले होते. घटस्फोटानंतर गौतमी पुन्हा एकदा कामात व्यग्र झाली आणि तिथेच तिची गाठ राम कपूरशी पडली. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झालेल्या या नात्याला घरच्यांचा विरोध होता. तरीही या दोघांनी लग्न केलं. दोघांच्या सुखी संसाराची २३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

गौतमीचे पहिले लग्न आणि घटस्फोट

लग्नापूर्वी गौतमीचं नाव गौतमी गाडगीळ होतं. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या गौतमीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. राम कपूरशी लग्न करण्यापूर्वी गौतमीचं पहिलं लग्न मधुर श्रॉफ यांच्याशी झालं होतं. मधुर श्रॉफ हे पेशाने कमर्शियल फोटोग्राफर आहेत. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.

गौतमी व राम कपूरची पहिली भेट आणि मैत्री

राम आणि गौतमी यांची पहिली भेट ‘घर एक मंदिर’ (२०००) या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत त्यांनी दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती. कामाच्या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.

रामचा स्वभाव खूप मनमोकळा, थोडा रागीट आणि खाण्यापिण्याची प्रचंड आवड असलेला असा होता. गौतमी स्वभावाने शांत आणि शिस्तप्रिय होती. सुरुवातीला कोणालाच वाटलं नव्हतं की हे दोघे कधी एकत्र येतील, पण त्यांच्यातील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.

राम कपूरने गौतमी प्रपोज केलं तेव्हा…

रामने एका पार्टीत गौतमीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे, गौतमीने लगेच होकार दिला. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्यांचा काहीसा विरोध होता, कारण राम कपूर त्यावेळी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि गौतमीचं हे दुसरं लग्न होतं. पण कुणाच्याही विरोधाला न जुमानता या जोडीने १४ फेब्रुवारी २००३ (व्हॅलेंटाईन डे) रोजी लग्नगाठ बांधली. त्यांना सिया आणि अक्स अशी दोन मुलं आहेत.

राम कपूरने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की गौतमीच्या आयुष्यातील या भूतकाळाचा त्यांच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही आणि त्यांनी एकमेकांना पूर्णपणे स्वीकारलं. आज ते टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जातात.