Ramayana fame Actors: रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याबरोबरच रामानंद सागर निर्मित रामायण या मालिकेचीदेखील प्रेक्षकांना आठवण झाली आहे.
रामायण हा कार्यक्रम ३९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही अनेक जण रामायण ही मालिका पाहतात. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’मधून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. या कलाकारांनी प्रचंड यश पाहिले. आज आपण या मालिकेतून लोकप्रियता मिळालेल्या ५ कलाकारांबद्दल जाणून घेऊ…
१. अरुण गोविल
अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेत प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.
अरुण गोविल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बॉलीवूडमधून केली. पहेली, सावन को आने दो, हिंमतवाला अशा चित्रपटांत या मालिकेआधी काम केले होते. मात्र, मोठ्या पडद्यावर त्यांना तितकी ओळख मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली.
रामानंद सागर यांच्या विक्रम व वेताळ मालिकेत राजा विक्रमादित्यची भूमिका साकारली. या भूमिकेतून त्यांनी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी रामायण या मालिकेत प्रभू रामांची भूमिका साकारली. त्यांच्या या पात्राचा लोकांवर इतका प्रभाव पडला की, लोकांनी प्रत्यक्षात त्यांना प्रभू राम मानायला सुरुवात केली.
२. दीपिका चिखलिया
दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. त्यांनीदेखील त्यांच्या करिअरची सुरुवात बॉलीवूडमधून केली. त्यांनी काही बी-ग्रेड सिनेमातही काम केले. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली. रामायण या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली. दीपिका सध्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.
अरुण गोविल व दीपिका चिखलिया यांच्याबरोबरच लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी, हनुमानाची भूमिका साकारणारे दारा सिंह, तसेच रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी या कलाकारांनादेखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही या कलाकारांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. दीपिका चिखलिया यांनी रामायणमधील त्यांचा लूक रिक्रिएट केला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले होते.
