रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील प्रभु रामचंद्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल सोशल मीडियावरही बरेच सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकदा चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावरूनत चाहत्यांसोबत शेअर करतात.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रामानंद सागर यांची ९० च्या दशकातील ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षक आजही बघतात. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना त्या काळी लोक देव मानत होते. या कलाकारांमध्ये प्रभू श्री रामांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांचाही समावेश होता. ते जिथे जायचे तिथे लोक त्यांच्या पाया पडायचे. त्यांची पूजाही करायचे. पण एक काळ असा होता, जेव्हा अरुण यांना सिगारेटमुळे शिव्याही पडायच्या.
अरुण गोविल सेटवर खूप सिगारेट ओढायचे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रामानंद सागर यांची अट मान्य केल्यानंतरही अरुण गोविल यांनी शूटमधून ब्रेक दरम्यान धूम्रपान करणे सोडले नाही. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, जेव्हा त्यांना शूटिंगमधून ब्रेक मिळायचा, तेव्हा तो पडद्यामागे जाऊन सिगारेट ओढायचे. अशाच एका ब्रेकमध्ये ते सिगारेट ओढत होते, त्यावेळी एक जण त्यांच्याजवळ आला आणि त्यांना खूप बोलला. अरुण यांना त्या दिवशी प्रेक्षकांच्या प्रेमाची जाणीव झाली. ते रामाची भूमिका साकारायचे, त्यामुळे प्रेक्षक त्यांना देव मानायचे. त्या घटनेनंतर अरुण यांनी धुम्रपान करणं सोडलं. कालांतराने ते आध्यात्मिक झाले.