‘स्टार प्रवाह’च्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑफ एअर झाली. तरीही या मालिकेतील पात्र अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मग ती दिपा असो, श्वेता असो, सौंदर्या असो किंवा कार्तिक. प्रत्येक कलाकारांनी आपापली पात्र उत्कृष्टरित्या साकारली होती. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. लवकरच या मालिकेतील अभिनेता खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ या दोन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय अंदलकर अभिनीत ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार ७ वाजता प्रसारित होणार आहे. तर २३ डिसेंबरपासून सुरू होणारी ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याच नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’मधील अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘रंग माझा वेगळा’मध्ये कार्तिक म्हणून झळकलेला अभिनेता आशुतोष गोखले ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत दिसणार आहे. याच मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीचा याचा खुलासा झाला.
दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका २३ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या ही नवी मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आशुतोष गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर त्याचं ‘जर तरची गोष्ट’ नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात आशुतोषसह प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी पाटील पाहायला मिळत आहे. या नाटकासाठी आशुतोषला बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.