शिवानी सुर्वे जवळपास १२ वर्षांपूर्वी ‘देवयानी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. घराघरांत देवयानी आणि संग्रामची जोडी चर्चेत आली होती. या मालिकेमुळे शिवानीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. यानंतर तिने काही हिंदी मालिकांमध्ये आणि पुढे, ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. कालांतराने छोट्या पडद्यावर यश मिळवल्यावर शिवानी सुर्वे चित्रपटांकडे वळली.

शिवानी सुर्वेने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती नेहमीच सर्वांना आकर्षित करते. अशी ही शिवानी आता ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता समीर परांजपे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा : शिवानी नव्हे तर…; अभिनेत्रीच्या वडिलांनी लेकीचं ठेवलेलं ‘हे’ नाव, मास्तरीण बाईंनी पहिल्यांदाच केला खुलासा

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेची स्टारकास्ट नेमकी काय असेल? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच अभिनेता ओमप्रकाश शिंदे यामध्ये भूमिका साकारेल याचा अधिकृत व्हिडीओ वाहिन्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. ओमप्रकाश यामध्ये रणजीत हे पात्र साकारणार आहे. आता त्याच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने मालिकेत एन्ट्री केली आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अभिनेत्री मानसी घाटे घराघरांत लोकप्रिय झाली. मानसी घाटेने स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची जवळची मैत्रीण असलेल्या साक्षीची भूमिका साकारली होती. आता ही मानसी एका नव्या रुपात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत झळकणार आहे.

हेही वाचा : १२ वर्षांपूर्वी ‘देवयानी’ अन् आता ‘मानसी’, नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानी सुर्वेची खास पोस्ट, प्रेक्षकांना म्हणाली…

मानसी घाटे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत गायत्रीची बहीण छाया ही भूमिका साकारत आहे. आयत्या सुखसोयी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी अन् नेहमी गायत्रीच्या पुढे पुढे करणारी असं या पात्राचं स्वरुप असणार आहे. याबद्दल सांगताना मानसी लिहिते, “पुन्हा एकदा कमबॅक करतेय… ‘छाया’ या पात्राच्या रुपात! आयुष्यात नेहमी देवावर विश्वास ठेव कारण, तो तुमच्यासाठी नेहमी चांगलं काहीतरी घेऊन येत असतो. पाहायला विसरू नका आजपासून ‘थोडं तुझं आणि थोडं माझं”

दरम्यान, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत शिवानी सुर्वे, समीर परांजपे आणि मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.