Ridhi Dogra on Raqesh Bapat: राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाला आहे. तो त्याच्या खेळामुळे सतत चर्चेत असतो. त्याची मते तो वेळोवेळी स्पष्टपणे मांडत असतो. तसेच, चुकीच्या गोष्टींना तो चुकीचेच म्हणतो आणि बरोबर गोष्टींना पाठिंबा देतो. त्यामुळे अभिनेत्याच्या खेळाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

“आम्हाला चिंता…”

आता राकेशची एक्स पत्नी रिद्धी डोगराने एका व्हिडीओमध्ये त्याच्याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच ती त्याच्या खेळाबद्दलही बोलली आहे. रिद्धीने नुकताच इन्स्टाग्रामवर आस्क मी क्वेश्चन हे सेशन घेतले. त्यावेळी एका चाहत्याने विचारले की, राकेश सध्या बिग बॉस मराठीमध्ये खेळत आहे. तू बिग बॉस मराठी पाहतेस का? त्यावर रिद्धी म्हणाली, “मला राकेशचा अभिमान आहे. तो खूप चांगले खेळत आहे. तो बिग बॉसमध्ये पुन्हा जात असल्याने आम्हाला चिंता होती. यावेळी तो खूप चांगले खेळत आहे आणि केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेत आहे.”

“तो जसा खऱ्या आयुष्यात आहे, तसाच तो तिथेही दिसत आहे. तो तिथे स्वत:ची जागा निर्माण करत आहे, स्वत:च्या नियमांवर खेळत आहे हे पाहून मी खूप आनंदी आहे.”

Award Banner

पुढे ती राकेशला उद्देशून म्हणाली, “मी खूप आनंदी आहे. मी तुला पाठिंबा देत आहे. पण, यावेळी जास्त पाठिंब्याची गरज नाही इतका तू चांगला खेळत आहेस; पण, माझा कायमच तुला पाठिंबा असेल.”

राकेश बापट याआधी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. तसेच, बिग बॉस १५ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाला होता. आता त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाला आहे. सहाव्या पर्वात त्याच्या खेळाचे अनेकदा कौतुक झाले आणि काही वेळा त्याला सुनावलेदेखील गेले. आता आगामी काळात त्याचा खेळ कसा असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरात काही गट पडले होते. आता ‘टोळी गँग’मधील रुचिता, रोशन हे सदस्य एलिमिनेट झाल्याने तसेच, अनुश्रीही ग्रुपबाहेर पडल्याने ‘टोळी’मध्ये एकटा विशाल राहिला आहे; तर राकेश हा ‘काटा गँग’मधील सदस्य आहे. त्यामध्ये प्रभू शेळके, तन्वी कोलते, दीपाली सय्यद हे सदस्य आहेत.

रिद्धी आणि राकेशबद्दल बोलायचे तर त्यांनी २०११ मध्ये लग्न केले होते; मात्र २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यात उत्तम मैत्री आहे. दोघेही एकमेकांच्या वाढदिवसाला आणि इतर महत्त्वाच्या दिवशी हजर असल्याचे दिसते. तसेच, अनेक मुलाखतींमध्येदेखील त्यांनी त्यांच्यात आजही चांगले बॉण्डिंग असल्याचे सांगितले. रिद्धी एका मुलाखतीत म्हणाली होती की, आम्ही घटस्फोट जरी घेतला असला तरी आम्ही आमची मैत्री वाचवली आहे.

रिद्धी नुकतीच द ५० या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये शिव ठाकरे, प्रिन्स नरुला, निक्की तांबोळी, अरबाज पटेल असे अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.