Raqesh Bapat Runner Up BBM 6: राकेश बापट हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी हिंदी सिनेमा आणि मालिकाविश्वास स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा ‘तुम बिन’ हा सिनेमा २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
२००१ ला प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच, ‘कोई मेरे दिल में हैं’, ‘ मर्यादा: लेकिन कब तक? ‘, ‘सलोनी’ अशा अनेक मालिकांमधून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मराठी मालिकेतून अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याची या मालिकेतील एजे ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राकेश बापट बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाला.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात राकेश बापटने अगदी पहिल्या दिवसापासून लक्ष वेधून घेतले होते. सुरुवातीला तो एकटा खेळत होता. त्यानंतर तन्वी, दीपाली, प्रभू व राकेश यांनी एकत्र येत काटा गँग हा ग्रुप तयार केला. शेवटपर्यंत हे स्पर्धक या ग्रुपमधून खेळत राहिले. वाईल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरसेदेखील या ग्रुपचा भाग झाली होती. या गटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. त्यांच्यात अनेकदा मतभेद, भांडणे, वाद पाहायला मिळाले, मात्र, शेवटी ते एकत्र राहिले.
राकेश बापट या संपूर्ण पर्वात शांतपणे खेळत असल्याचे दिसले. मोजक्या वेळी तो भांडताना दिसला. विशाल कोटियनबरोबरची त्याची स्पर्धा, विशालच्या वक्तव्यामुळे त्यांच्यात झालेल्या भांडणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. राकेश कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला शांत ठेवत त्या परिस्थितीला सामोरे गेला. त्याला जेंटलमन म्हटले गेले. अनेक कलाकारांनीदेखील त्याला जेंटलमन म्हणत त्याचे कौतुक केले.
राकेश बापट जिंकावा अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, राकेशला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली.
“तू जेंटलमन आहेस…”
ज्या कलाकारांनी राकेश बिग बॉसच्या घरात असताना पाठिंबा दिला, त्यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील रुचिर गुरव आणि अद्वैत कडणे यांचा समावेश होता. त्यांनी पोस्ट शेअर करत राकेशला पाठिंबा दिला होता. त्याच्या खेळाचे कौतुक केले होते.
आता राकेश बापट उपविजेता ठरल्यानंतर अद्वैत व रुचिर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी राकेश बापटबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “राकेश तुझं घरी स्वागत आहे, तू सगळ्यांची मने जिंकली आहेत आणि शेवटी त्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. तू जेंटलमन आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे.”
रुचिर व अद्वैतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी केक कापून सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, केकवर आमच्यासाठी तू विजेता आहेस असे लिहिले आहे.
दरम्यान, या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आमच्यासाठी विजेता राकेश बापटच आहे असे लिहिले आहे. आता बिग बॉस मराठीनंतर राकेश कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
