Raqesh Bapat Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अनेक कलाकारांची यामधून एक्झिट झाली, तर काही नवीन सदस्यांची यामध्ये एन्ट्रीसुद्धा झाली; तर सध्या घरातील काही स्पर्धक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे राकेश बापट.
राकेश बापट हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. करिअरच्या सुरुवातीला पहिल्याच चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालेली. आजही अभिनेत्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. हिंदीमध्ये काम केल्यानंतर राकेशने त्याच्या आईच्या इच्छेनुसार मराठीतही काम केलं. सध्या तो ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये आहे. यापूर्वी त्याने हिंदी ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतलेला. सध्या राकेश बापट ‘बिग बॉस’मधील त्याच्या व राखीच्या बाँडमुळे चर्चेत आहे. राखीला राकेश आवडतो असं ती अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात म्हणताना दिसली आहे. अशातच आता राकेशची बहीण शीतल बापट यांनी राकेश बापटच्या लोकप्रियतेबद्दल सांगितलं आहे. राकेशची बहीण त्याच्याबद्दल काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…
राकेशबद्दल काय म्हणाल्या शीतल बापट?
‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना शीतल बापट भाऊ राकेशबद्दल म्हणाल्या, “गेम, प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी करणं हा त्याचा स्वभावच नाहीये, तो ते करूच शकत नाही. जर कधी मी चिडले किंवा कोणीही चिडलं तर तो नेहमी हेच सांगतो की आयुष्य खूप छोटं आहे, वाद धरुन का बसायचं, सोडून द्या गोष्टी आपोआप होतील अशा स्वभावाचा तो आहे.”
राकेश बापटला रक्ताने लिहिलेली पत्र यायची
‘तुम बिन’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राकेश बापटने अनुभवलेल्या लोकप्रियतेबद्दल शीतल म्हणाल्या, “त्या वेळेच्या त्याच्या स्टारडमबद्दल बोलायचं झालं तर आमच्या घरी रक्ताने लिहिलेली पत्र यायची. लोक घरी येऊन राकेशची वाट बघायचे, ती खरी लोकप्रियता होती. आताचं जे स्टारडम आहे, सोशल मीडियाचं घरीबसून फोटो लाईक करणं हे वेगळं आहे. आपल्याला मिलियनमध्ये फॉलोअर्स असले म्हणजे आपण लोकप्रिय आहोत असं नसतं. तेव्हाचं स्टारडम वेगळं होतं, जे सोशल मीडिया नसताना होतं; त्याने ते स्टारडम अनुभवलं आहे.”
शीतल बापट पुढे म्हणाल्या, “तुम बिनमधील जे कलाकार होते ते करारबद्ध असल्यामुळे त्यांना अनेक चांगले प्रोजेक्ट सोडावे लागले; म्हणजे सुरज बडजातिया यांच्या प्रोजेक्टलासुद्धा राकेशला नकार द्यावा लागला. इंडस्ट्रीत कोणाचीही ओळख नसताना स्वबळावर यशाच्या शिखरावर जाणं आणि मग पुन्हा अपयश मिळाल्यानंतर टिकून राहणं आणि २५ वर्षे इंडस्ट्रीत सातत्याने काम करणं सोपं नाही. इतरांशी स्पर्धा करणं हा त्याचा पिंडच नव्हता. तो तसाच आहे आणि तसाच गेम तो आता खेळत आहे. समोर जे आलं आहे ते मजा करत करूयात, अशा स्वभावाचा तो आहे. तो खोडकर स्वभावाचा आहे, लहानपणीसुद्धा तो खूप खोड्या करायचा.”
