Raqesh Bapat reveals his extreme workout and diet schedule : मनोरंजनविश्वात असे अनेक अभिनेते आहेत जे फिटनेसची विशेष काळजी घेतात. निरोगी राहण्यासाठी आणि स्क्रीनवर छान दिसण्यासाठी ते नियमीत व्यायाम, योग्य आहार या गोष्टी फॉलो करतात. अनेकदा ही मंडळी त्यांच्या फिटनेसबद्दल, डाएटबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता राकेश बापटनेही याबद्दल सांगितलं आहे.
राकेश बापट मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडेच तो ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामुळे चर्चेत आला. या पर्वाचा तो उपविजेता ठरला. राकेश अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात त्याच्या स्वभावामुळे, गेम प्लॅनिंगमुळे चर्चेत राहिला. राकेश बापटने ‘तुम बिन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तेव्हा अभिनेत्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झालेली. आजही त्याचे अनेक चाहते आहे. त्याने त्याच्या अभिनयाने आणि सौंदर्याने आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता त्याने ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर त्याच्या फिटनेसबद्दल सांगितलं आहे.
फिटनेसबद्दल राकेश काय म्हणाला?
राकेश फिटनेसबद्दल बोलताना म्हणाला, “मिस्टर इंडियासाठी माझी निवड झाली होती. पहिल्यांदा कोणीतरी अशा स्पर्धेत भाग घेत होतं आणि तो मी होतो. तेव्हा खूप मेहनत केली. तेव्हा मी रोज व्यायाम करायचो. दिवसाला २५ अंडी खायचो, दीड किलो चिकन खायचो. मला नैसर्गिकरित्या बॉडी बनवायची होती. त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा आधार घेतला नाही. मी आता जसा आहे त्याहून दुप्पट शरीरयष्टीचा होता पूर्वी.”
राकेश पुढे म्हणाला, “मी सकाळी चार वाजता उठायचो ते दहापर्यंत मी व्यायामच करत असायचो. आता मी त्याबद्दल विचार केला तरी दमतो की मी तेव्हा ते कसं केलं? त्यावेळेला या स्पर्धा खूप मोठ्या असायच्या. नशिबाने साथ दिली पण, मनोरंजनविश्वाशी कोणताही संबंध नसताना मी हे केलं टिकून राहिलो. हा प्रवास खूप चढ उतारांचा होता. अनेकदा खचलो पण पुन्हा नव्याने उभा राहिलो.”
दरम्यान, राकेश बापटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत चित्रपट मालिका आणि रिअॅलिट शोमध्ये सहभाग घेतला आहे. मराठीतील ‘नवरी मिळे हिटलर’ला या मालिकेमुळे तो खऱ्या अर्थाने मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने मराठी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला तिथेही प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला.”
