Raqesh Bapat reveals his childhood battle with dyslexia : राकेश बापट हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. अलीकडेच तो मराठी ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वात झळकला होता. राकेश या पर्वाचा उपविजेता ठरला.
राकेशने यापूर्वीसुद्धा ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे त्याच्याकडे रिॲलिटी शोमध्ये काम करण्याचाही अनुभव आहे. शिवाय अभिनयाव्यतिरिक्त तो मूर्तीकार, चित्रकार आहे. अभिनेत्याला वाद्य वाजवण्याचीही आवड आहे. तो बासरीसुद्धा वाजवतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. अशातच आता राकेशने त्याला असलेल्या कलेची आवड याबद्दल ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. परंतु, याचवेळी अभिनेत्याने त्याला लहानपणी डिस्लेक्सिया असल्याचं म्हटलं आहे.
डिस्लेक्सियाबद्दल राकेश बापट काय म्हणाला?
मुलाखतीत राकेशला त्याला चित्रकला आणि इतर गोष्टींची आवड असल्याने आणि या क्षेत्रात पूर्वीच काहीच काम न केल्याने तो मनोरंजनविश्वाकडे कसा वळला याबद्दल विचारल्यानंतर अभिनेता म्हणाला, “सगळा नशीबाचा खेळ आहे. माझा नशिबावर खूप विश्वास आहे. मी कुठलीच गोष्ट ठरवून केलेली नाहीये. शाळेतील चार भितींमध्ये माझं मन कधी रमलंच नाही. मला डिस्लेक्सिया होता. खूप लोक असे असतात जे शिक्षणाच्या चौकटीत बसत नाहीत. त्यापलीकडे जाऊन ते कला किंवा इतर माध्यमातून व्यक्त होतात.”
राकेश पुढे म्हणाला, “आजही स्क्रिप्ट वाचताना मी आधी ती स्क्रिप्ट वाचतो पण, मी लगेच रिडिंगसाठी बसू शकत नाही. त्याआधी मला शांत बसून ती नीट वाचावी लागते नाहीतर अक्षर इकडनं तिकडे उड्या मारतात. त्यामुळे मला आधी त्यांच्याशी मैत्री करावी लागते. आधी ही समस्या खूप होती. त्यामुळे आई-बाबा खूप काळजी करायचे, पण मला माहीत होतं की मला घाई करायची नाहीये. मी फार घाई करुच शकत नाही. ते मला जमतच नाही.”
राकेश पुढे म्हणाला, “मी ट्रॅकिंगला जायला लागलो, चित्र काढायचो, निरीक्षण करायचो. मला आवाजाचा त्रास व्हायचा तेव्हा मी खोलीत एकटा कोंडून बसायचो. मला डिस्लेक्सिया असल्यामुळे अनेक लोक खूप सल्ले द्यायचे. त्यामुळे खूप गोंधळ व्हायचा. आता जग खूप पुढे गेलं आहे तुम्हाला अनेक गोष्टींकमधून मदत मिळू शकते, पण तेव्हा असं काही नसायचं.”
