Ridhi Dogra slams Vishal Kotian over divorce remarks : ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठं भांडण झालं. राकेशने विशालला नॉमिनेट केलं, विशाल लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतो ते आवडत नसल्याचं राकेशने म्हटलं. यानंतर विशालने थेट राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. यामुळे राकेश प्रचंड संतापला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या भांडणानंतर बिग बॉसने दोघांनाही शिक्षा दिली आहे. या सर्व गोंधळानंतर राकेशच्या कुटुंबाने विशालने केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता राकेशची एक्स पत्नी रिद्धी डोगरा हिनेही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये राकेशने विशालचं नाव घेतलं. विशाल ज्या पद्धतीने घरात वागतो आणि बोलतो ते त्याला आवडत नाही. तसेच, राकेशने विशालवर असा आरोप केला की, तो घरातील इतर स्पर्धकांशी राकेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतो. हे ऐकून विशाल संतापला आणि त्याने विचारलं की, “मी असं बोलताना तू स्वतः कधी ऐकलं आहेस का?” यावर विशालनेही आरोप केला की, राकेश इतर स्पर्धकांशी विशालच्या वयाबद्दल चर्चा करत असतो.

राकेश बापट व विशाल कोटियन एकमेकांच्या अंगावर धावून गेले

पुढे विशाल म्हणाला, “तुझ्याबद्दल मला जे काही माहिती आहे, ते मी सर्वांना सांगेन. घराबाहेर ये, तुझा घटस्फोट का झाला आणि तुझे किती अफेअर्स होते, हे मी सर्वांना सांगेन.” हे ऐकून राकेश प्रचंड संतापला आणि त्याने विशालला जाब विचारला की, “तू माझ्या घटस्फोटाबद्दल का बोलत आहेस?” त्यानंतर दोन्ही स्पर्धक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी बाचाबाचीत राकेश बागेतील आरशाला जाऊन धडकला. घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.

Award Banner

हाणामारी करणं हे ‘बिग बॉस’च्या कराराचं उल्लंघन आहे. करारानुसार, घरात शारीरिक हिंसाचार करता येत नाही. पण या वादानंतर बिग बॉसने विशालला पूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं आणि त्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर केलं. तर राकेशला या आठवड्यासाठी नॉमिनेट केलं. या दोघांच्या भांडणावर होस्ट रितेश देशमुख काय म्हणतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Raqesh Bapat ex-wife Ridhi Dogra slams Vishal Kotian over divorce remarks(1)
राकेश बापट व रिद्धी डोगरा (फोटो – सोशल मीडिया)

रिद्धी डोगराची प्रतिक्रिया

रिद्धी डोगराने विशालच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत हे अजिबात योग्य नाही, असं लिहिलं. तिने या घटनेचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आणि हे सगळं ‘अस्वीकार्य’ असल्याचं म्हटलंय.

रिद्धीने काही दिवसांपूर्वी राकेशचं कौतुक केलं होतं. “मला राकेशचा अभिमान आहे, तो खूप चांगलं खेळतोय. तो पुन्हा बिग बॉसमध्ये जात असल्याने आम्हाला सर्वांना काळजी वाटत होती, पण यावेळी तो खूप छान खेळतोय. तो जसा आहे तसाच शोमध्ये दिसतोय. आम्ही ओळखतो तो राकेश असाच आहे. मी नेहमीच त्याला सपोर्ट करणार आहे,” असं रिद्धी डोगरा म्हणाली.

रिद्धी डोगरा आणि राकेश बापट यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते आणि २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. राकेशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला देखील रिद्धी गेली होती.