Raqesh Bapat talks about ex wife Ridhi Dogra : तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची विजेती ठरली असून अभिनेता राकेश बापट उपविजेता ठरला. राकेश बापट बिग बॉसमध्ये असताना त्याची एक्स पत्नी रिद्धी डोगराने त्याला पाठिंबा दिला होता. इतकंच नाही तर विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं, तेव्हाही रिद्धीने पोस्ट करून संताप व्यक्त केला होता. राकेश व रिद्धी वेगळे झाले असले तरी त्यांच्यात अजूनही मैत्री आहे.

बिग बॉसच्या घरात अनेक चढ-उतार आले, पण रिद्धीने नेहमीच आपली मैत्री जपल्याचे राकेशने आवर्जून नमूद केले. ‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राकेशने सांगितलं की, त्याला शोमध्ये चांगलं खेळताना पाहून त्याची एक्स पत्नी रिद्धीला खूप आनंद झाला होता. “रिद्धी खूप खूश होती,” असं राकेशने सांगितलं.

राकेश म्हणाला, “रिद्धी माझ्या विजयासाठी प्रार्थना करत होती. तिने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि आम्ही दोघेही कायम एकमेकांच्या पाठीशी आहोत.” राकेशने म्हटलं की, बिग बॉसच्या घरात असताना रिद्धीबद्दल बोलताना नेहमीच आदर ठेवला. तिच्याबद्दल बिग बॉसच्या घरात तो खूप सावधपणे बोलत होता.

राकेश घराबाहेर आल्यावर रिद्धी काय म्हणाली?

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर रिद्धीने त्याला काय म्हटलं? असं विचारल्यावर राकेश म्हणाला, “ती म्हणाली, ‘राकेश, तू खूप छान खेळलास. तू इतक्या जेंटलमनसारखा खेळ खेळशील असं वाटलं नव्हतं.’ तिला माझा खूप अभिमान वाटला.”

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांचं लग्न आणि घटस्फोट

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांची पहिली भेट ‘मर्यादा: लेकिन कब तक?’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री लवकरच खऱ्या आयुष्यातील प्रेमात बदलली. २०१० च्या सुरुवातीला त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि २०११ मध्ये एका खासगी सोहळ्यात ते लग्नबंधनात अडकले.

अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर, २०१५-२०१६ च्या सुमारास त्यांनी वेगळे होत असल्याची घोषणा केली आणि पुढे २०१९ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. याबद्दल बोलताना रिद्धीने म्हटलं होतं की, काळानुसार पती-पत्नी म्हणून त्यांच्या अपेक्षा आणि एकमेकांबद्दलची मतं जुळत नव्हती, त्यामुळे त्यांनी परस्पर संमतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतरही राकेश व रिद्धी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघेही एकमेकांबद्दल आदराने बोलतात. एकमेकांना चांगल्या वाईट प्रसंगात साथ देतात. तसेच एकमेकांच्या वाढदिवसालाही ते एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात.