Raqesh Bapat Shares Video: राकेश बापट हा हिंदी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी तो मोठ्या चर्चेत आला होता. राकेश सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो वेळोवेळी सोशल मीडियावर व्हिडीओ, पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.
नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सुरुवातीला पूजा करताना दिसत आहे. त्याने देवासमोर माती ठेवली आहे. तो नमस्कार करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
राकेश बापटने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?
व्हिडीओमध्ये पुढे राकेश श्री गणेशाची मूर्ती बनवताना, कधी मूर्तीच्या पाया पडताना, विविध मुद्रेतील, विविध भाव असलेल्या गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळत आहे. तसेच, कार्यशाळेत लहान मुलांना गणपतीची मूर्ती बनवायला शिकवत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही फोटोंमध्ये तो गणपतीला रंगवतानादेखील दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना राकेश बापटने “शुभारंभ, गणपती बाप्पा मोरया” असे लिहिले आहे. यावरून राकेशने यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तो लवकरच गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यास सुरुवात करणार आहे.
नेटकरी काय म्हणाले?
राकेशच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “यावर्षी तू बनवलेल्या गणपतीचा लूक पाहण्यासाठी उत्सुक आहोत.” दुसऱ्या एकाने लिहिले, “तुझ्याकडे किती सुंदर कौशल्य आहे. तुझ्या हातून घडलेली बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी आम्ही आतुर असतो. मनात जितकी शांतता आणि निर्मळता असते, तितकीच ती कलेत उतरते, हे अगदी खरंय. आम्हाला तुझा अभिमान आहे”, एकाने लिहिले, “राकेश दादा आमचं तुझ्यावर प्रेम आहे”, आणखी एकाने लिहिले, “खूप छान”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राकेशचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.



दरम्यान, राकेश आगामी काळात कोणत्या मालिकेतून किंवा इतर प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
