Rakhi Sawant Talks About Raqesh Bapat’s Relationship : राकेश बापट मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामुळे चर्चेत आहे. राकेश ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाचा उपविजेता ठरला. कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी घरात घडणाऱ्या गोष्टींमुळे संपूर्ण सीझन राकेश कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत राहिला. राखी सावंतबरोबरचा त्याचा बाँड तर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला.

राखी सावंतला राकेश बापट आवडायचा आणि तिने अनेकदा याबद्दल ‘बिग बॉस’च्या घरात त्याला सांगितलंही होतं. अशातच आता ‘बिग बॉस’ संपल्यानंतर राखीने दिलेल्या एका मुलाखतीत राकेशबरोबरच्या बाँडबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने खऱ्या आयुष्यात राकेशची गर्लफ्रेंड आहे आणि त्यानेच तिला याबद्दल ‘बिग बॉस’च्या घरात असताना सांगितलं होतं असं म्हटलं आहे. राकेशबद्दल राखी नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

एकतर्फी प्रेम केल्याचा मला खूप पश्चाताप – राखी सावंत

‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत राखी राकेश बापटबद्दल बोलली आहे. यावेळी तिने ‘बिग बॉस’च्या घरात असताना राकेशने तिचा खूप अपमान केला  असं म्हटलं आहे. राखी राकेशबद्दल म्हणाली, “एकतर्फी प्रेम केल्याचा मला खूप पश्चाताप होत आहे. त्यांने माझा खूप अपमान केला पण, आता मला अपमान झाल्यानंतर वाईट वाटतच नाही. इतक्या लोकांनी माझा अपमान केला आहे की, मला काही फरकच पडत नाही. मला त्याची सवय झाली आहे.”

रिलेशनशिपमध्ये आहे राकेश बापट

राखी राकेश बापटच्या गर्लफ्रेंडबद्दल म्हणाली, “राकेश बापट त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर प्रामाणिक आहे. त्याची गर्लफ्रेंड पुण्यात राहते. अनेकांचं एकतर्फी प्रेम असतं. मला आयुष्यात कधीच एकतर्फी प्रेम होईल असं वाटलं नव्हतं. पण, कधी कधी एकतर्फी प्रेम होऊ शकतं.”

राकेश बापटबद्दल राखी पुढे म्हणाली, “तो कमिटेड आहे त्याची गर्लफ्रेंड आहे. आमचा लग्नाचा कोणाताही विचार नाहीये. त्याने मला आतमध्येच सांगितलं होतं की राखी वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर मी म्हटलेलं तू तुझं बघ मी माझं बघेन. मला तू आवडतोस. त्याने मला सांगितलं की राखी मी रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे. ती पुण्यात राहते. हे करमणुकीसाठी नव्हतं. तसं असतं तर मी घराबाहेर आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलले नसते. मला तो आवडला. हे माझं एकतर्फी प्रेम आहे.”