Raqesh Bapat cooking Video: हिंदी चित्रपट, मालिका तसेच मराठी मालिका यांमधून अभिनेता राकेश बापटने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. फक्त अभिनयातूनच नाही तर बिग बॉस ओटीटी, हिंदी बिग बॉस आणि बिग बॉस मराठी यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येदेखील तो सहभागी झाला होता.

बिग बॉस मराठीचे सहावे पर्व नुकतेच संपले आहे. या पर्वात राकेश बापट स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्याची काही नातीदेखील या घरात तयार झाली. काटा ग्रुपमधील स्पर्धकांच्या पाठीमागे तो खंबीरपणे उभा राहिला. काही स्पर्धकांबरोबर त्याची भांडणेदेखील झाली. तो ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींना सामोरा गेला, त्यामुळे तो जेंटलमन म्हणून ओळखला जात आहे.

आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर राकेश बापटने त्याच्या भाचीच्या मदतीने एक खास पदार्थ बनवला आहे. राकेश बापटने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राकेशने आता कोणता पदार्थ बनवला आहे आणि तो कसा बनवला आहे, याबद्दल जाणून घेऊ…

व्हिडीओमध्ये राकेश म्हणाला, “मी आता पुण्यात आलोय. बिग बॉसच्या घरातून मी माझ्या घरात आलो आहे. तर बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर पहिल्यांदा मी आमचा आवडता मँगो स्टिकी राईस हा पदार्थ बनवणार आहे. माझी भाची ईशा मला मदत करणार आहे.

राकेश बापटने बनवला मँगो स्टिकी राईस

ईशा सांगते, “आम्ही रात्रभर तांदूळ भिजवलेला आहे. त्यातील पाणी काढून त्याला मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवलेलं आहे. २० मिनिट त्या तांदळाला मलमलच्या कपड्यात वाफवायचे आहे. आता आपल्याला नारळाचा सॉस बनवायचा आहे.

राकेश म्हणतो, “एका कढईत एक कप कोकोनट मिल्क घालायचे. ते कोमट झाल्यानंतर एक तृतीयांश कप साखर घालायची आहे. ती साखर त्यात विरघळू द्यायची. अर्धा चमचा मीठ घालायचं. तोपर्यंत तांदूळ वाफवून होतो. तो भात एका भांड्यात काढायचा. त्यामध्ये ८० टक्के नारळाचं सूप घालायचं. त्यानंतर ते मिश्रण २० मिनिटं ठेऊन द्यायचं. आता आपल्याला टॉपिंग सॉस बनवायचा आहे. अर्धा कप कोकोनट मिल्क आहे ते पातेल्यात घ्यायचं; थोडीशी साखर, मीठ, कॉर्न स्टार्च टाकायचं. ते थो़डंसं घट्ट होऊ द्यायचं. आता आम्ही आंबा कापून घेतला आहे, सॉस आणि भातही तयार आहे, त्याला आता डेकोरेट करायचं.”

पुढे राकेश एका प्लेटमध्ये भात ठेवतो, त्याच्या बाजूला कापलेला आंबा ठेवतो, त्यावर सॉस टाकतो. पुढे त्यावर तो भाजलेले तीळ टाकतो. शेवटी ईशा व राकेश आम्हाला हा पदार्थ जमला आहे असं म्हणतात.

आता राकेश बिग बॉसनंतर कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.