‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच राकेश बापटच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती. याचा दमदार प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘तुझ्याकडे तुला मागणे’! या नव्याकोऱ्या मालिकेत राकेश प्रमुख नायकाची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री सायली साळुंखे यामध्ये ‘इरा’ या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.
वडील-मुलाच्या नात्याची सुंदर गोष्ट प्रेक्षकांना ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. या मालिकेत राकेश अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. ‘अभिमान सरदेसाई’ असं त्याच्या पात्राचं नाव असून, अतिशय प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा असलेला यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याच्या भूमिकेत राकेश दिसणार आहे.
राकेशच्या या नव्या मालिकेला स्टार प्रवाहकडून प्राईमस्लॉट देण्यात आला आहे. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही मालिका येत्या २६ ऑक्टोबरपासून दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. टीआरपीच्या दृष्टीने हे रात्रीचे स्लॉट अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आता राकेशच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा कसा सपोर्ट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या रात्री ८ वाजताच्या स्लॉटला अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रसारित केली जाते. आता राकेशची नवीन मालिका सुरू झाल्यावर अर्णव-ईश्वरीची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? की याची वेळ बदलली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अलीकडेच ‘स्टार प्रवाह’च्या दुपारच्या सत्रातील दोन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अर्णव-ईश्वरीची मालिका देखील दुपारच्या स्लॉटला प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृतरित्या घोषणा केली जाईल.
