Raqesh Bapat on Bollywood managers politics : राकेश बापट मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तुम बिन’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्याची सर्वत्र प्रचंड क्रेझ निर्माण झालेली. परंतु, त्यानंतर अभिनेत्याने केलेल्या कामाला तितकासा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पहिलाच चित्रपट सुपर हिट ठरला परंतु, त्यानंतर बराच संघर्ष त्याला करावा लागला. अशातच आता राकेशने त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे.

राकेश बापट अलीकडे मराठी ‘बिग बॉस’मध्ये झळकला. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा तो उपविजेता ठरला. अशातच आता त्याने घराबाहेर आल्यानंतर व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्याने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ज्याचा त्याच्या करिअरवर परिणाम झाला. त्याच्या हातून चांगले प्रोजेक्ट्स गेले. अभिनेता नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

राकेश बापटने सांगितला संघर्षकाळ

मुलाखतीत राकेशला त्याच्या ‘तुम बिन’नंतरच्या प्रवासाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “बाहेरनं बघायला ही दुनिया खूप वेगळी दिसते. तुम बिन मला जेव्हा मिळाला तेव्हा मी नवीन होतो आणि नवीन असताना तुम्ही करारबद्ध असता. तुम्हाला त्यांच्याबरोबरच काम करावं लागतं. खूप काही घडलं होतं. तेव्हा मला मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं आणि तेव्हा मॅनेजर असायचे. मला मोठ मोठ्या मॅनेजरने स्वत: बोलावलं आणि सांगितलं की आम्हाला तुझ्यासाठी काम करायचं आहे. त्यांनी मोठ्या कलाकारांसाठी काम केलं आहे मी नाव नाही घेऊ शकत.”

मॅनेजरने केलेली फसवणूक

राकेश याबद्दल म्हणाला, “मला असं वाटतं की त्या मॅनेजरमुळे माझं खूप काम गेलं आहे. कारण – तो जे मानधन सांगायचा, मला तर माहीतही नसायचं की कोणत्या ऑफर येत आहेत. तो सरळ म्हणायचा की हा एवढ्या पैशांमध्ये काम करणार. त्यानंतर जेव्हा मी त्या लोकांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. त्याने तुझ्यापर्यंत पोहचू दिलं नाही आम्हाला. जो प्रोजेक्ट माझ्याकडे येणार होता तो त्याने दुसरीकडे फिरवला. असे एवढे किस्से झाले आहेत. एक नाही तर तीन मॅनेजर होते माझे तेव्हा. त्यावेळी कोणी मार्ग दाखवणारा नव्हता. त्यामुळे खूप काही घडलं.”

दरम्यान, राकेश बापटने ‘तुम बिन’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘मुंबई आपली आहे’, ‘सात फेरे’, ‘मर्यादा लेकीन कब तक’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘बिग बॉस ओटीटी’, ‘बिग बॉस मराठी’ अशा चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.