Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. तन्वी कोलते या पर्वाची विजेती झाली असून अभिनेता राकेश बापट यंदा उपविजेता ठरला आहे. फिनाले पार पडल्यावर तन्वी Deserving विजेती नाहीये असं अनेकांचं म्हणणं होतं. याबाबत राकेश बापटने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

राकेशचं मत विचारल्यावर तो ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी या रिझल्टबद्दल अतिशय खूश आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण, आमचं एकच म्हणणं आहे की, जो कोणी विजेता होईल तो ‘काटा’ ग्रुपचा व्हावा. तन्वीमध्ये खूप जिद्द आहे. तिचं पहिल्या दिवसापासून एकच ध्येय होतं ते म्हणजे…मला ट्रॉफी जिंकायचीये. तिने जे ठरवलं ते तिने करून दाखवलं…अखेर खेळ संपल्यावर शंभर दिवसांनी ती ट्रॉफी जिंकली. ज्या लोकांचं व्हिजन स्पष्ट असतं असे लोक मलाही खूप आवडतात…अशी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणारी फार क्वचित लोक असतात. ती अजिबात भरकटली नाही…तिने आपलं ध्येय पूर्ण केलं.”

राकेश पुढे म्हणला, “तन्वीमध्ये किती जिद्द आहे हे मी गेल्या शंभर दिवसांत पाहिलंय. शेवटी आपण म्हणतो ना..जो जीता वही सिकंदर! आता ती Deserving आहे की नाही याबद्दल सांगायचं झालं, तर ती नक्कीच ही ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी Deserve करते.”

भाऊ-बहीण दोघंही अक्कलकोटला जाणार…

“शो संपल्यावर कोणाबरोबर मैत्री कायम ठेवणार? याविषयी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश म्हणाला, “जो आमचा काटा ग्रुप आहे…त्यांच्याबरोबर माझी मैत्री कायम राहणार आहे. तन्वी माझी लहान बहीण आहे, दिपाली माझी खूप छान मैत्रीण झालीये, प्रभू, रेवा…आम्ही सगळ्यांनी एकत्र कोकणात जायचं असं ठरवलं आहे. आम्हाला तन्वीच्या गावी जायचं आहे. तन्वी आणि मी आम्ही दोघंही स्वामीभक्त आहोत…त्यामुळे ट्रॉफी घेऊन आता आम्ही अक्कलकोटला सुद्धा जाणार आहोत. खरी नाती खूप क्वचित जोडली जातात पण, या घरात मला अनेक जवळचे लोक भेटले.” असं मत राकेशने व्यक्त केलं.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात तन्वीने बाजी मारली असून, राकेश या सीझनचा उपविजेता ठरला आहे. विशाल कोटीयन तिसऱ्या स्थानी, अनुश्री माने चौथ्या स्थानी तर, दिपाली सय्यद पाचव्या स्थानी एलिमिनेट झाल्याचं पाहायला मिळालं.