Raqesh Bapat & Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंतने अनेकदा जाहीरपणे राकेश बापट मला आवडतो असं म्हटलं होतं. याशिवाय राकेश-तन्वीला एकत्र डान्स करताना पाहून राखीने स्वत:चे केसही कापले होते. यामुळे अनेकांना राखी गेमसाठी फक्त ड्रामा करतेय असं वाटत होतं. पण, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. शो संपल्यावरही राखीने, “राकेशवर माझं खूप जास्त प्रेम आहे, आणि हे प्रेम एकतर्फी आहे” असं वक्तव्य केलं. याशिवाय राखीने राकेशबरोबर संसार थाटण्याची इच्छाही व्यक्त केली. या सगळ्यावर आता राकेशने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
राखीविषयी बोलताना राकेश ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीत म्हणाला, “मी पहिल्या दिवसापासून सर्वांना सांगतोय…राखी मनाने खूप चांगली मुलगी आहे. तिचं व्यक्तिमत्त्व फार वेगळं आहे…तिच्या मनात प्रत्येकाबद्दल काळजी असते. राखीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आम्हा सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवलं, यावरून तिचा स्वभाव समजून येतो. माणूस म्हणून राखी मला प्रचंड आवडते. एक मित्र म्हणून माझंही तिच्यावर प्रेम आहे…राखीसाठी फ्रेंडशिप Vibes आहेत. आताही मी तिला सांगेन की, राखी तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस.”
याशिवाय ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत राकेश म्हणाला, “राखी यारो की यार आहे…दिलदार आहे. ती खरंच खूप वेगळी आहे. कॅमेऱ्यासमोरची राखी वेगळी आणि कॅमेरा बंद असताना राखी पूर्णपणे वेगळी असते. आम्ही लकी आहोत खरंतर, आम्हाला राखीची ती दुसरी बाजू पाहायला मिळाली. तिची प्रेमळ बाजू या ‘बिग बॉस मराठी’च्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाली. तिने आम्हा सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवलं म्हणूनच मी तिला अन्नपूर्णा म्हणायचो. मात्र, राखीने घरात गेमही तेवढाच खेळला. ती इतक्या चुगल्या करायची…मी तिला तोंडावर सांगायचो अगं राखी दिसतंय आम्हाला की, तू गेम खेळतेस.”
“काही नाती टिकत नाहीत, पण मैत्री…”
“तिची एक गोष्ट चांगलीये ती म्हणजे…काम असेल तेव्हा ती स्वत:चं काम खूप सिरियसली घेते आणि जेव्हा मजा करायची तेव्हा तिची मजा सुरू असते. ‘बिग बॉस’ तिच्यासाठी देव आहेत…आणि त्या शोसाठी ती काहीही करू शकते. तिची ‘बिग बॉस’प्रती असलेली कमिटमेंट मला खूप आवडते. राखीएवढं आणि तिच्यासारखं मनोरंजन कोणीच करू शकत नाही…आणि यात काहीच दुमत नाही. राखीने तिच्या भावना एक्स्प्रेस केल्या…पण, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तिच्या भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या वेगळ्या…काही नाती टिकत नाहीत. पण, मैत्री- फ्रेंडशिप कायम टिकते असं मला वाटतं. आता ती माझी खूप चांगली मैत्रीण झालीये त्यामुळे तिला जेव्हा गरज असेल तेव्हा मी तिच्या मदतीसाठी नक्की जाणार. बाकी मला गेमसाठी कोणाचाही वापर करायचा नव्हता…पण, राखीच्या एन्ट्रीमुळे घराला एक वेगळी एनर्जी मिळाली.” असं मत राकेशने राखीविषयी व्यक्त केलं.
