Raqesh Bapat Talks About Parenthood : राकेश बापट मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडे अभिनेता ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत होता. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा तो उपविजेता ठरला. ‘बिग बॉस’च्या घरात राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरला.
राकेश गेली २५ वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत चित्रपट, मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये त्याने काम केलं आहे. त्याची एक्स पत्नीसुद्धा या क्षेत्रात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोगराचं नाव घेतलं गेलं. एकदा यावरुन त्याचं स्पर्धक विशाल कोटियनशी मोठं भांडणही झालं होतं. अशातच आता घराबाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
राकेश बापट व रिद्धी डोगरा हे विभक्त झाले असले तरी आजही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. दोघे आजही एकमेकांसाठी उभे राहतात, कौतुक करतात. अशातच आता राकेशने ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोट, पालकत्व याबद्दल सांगितलं आहे. राकेश याबद्दल नेमकं काय म्हणाला सविस्तर जाणून घेऊयात…
…म्हणून घेतला घटस्फोट
राकेशला मुलाखतीत त्याच्या एक्स पत्नीबद्दल विचारल्यानंतर अभिनेता म्हणाला, “रिद्धी आणि मी कायमच खूप चांगले मित्र-मैत्रीण राहिलो आहोत. मी माझ्या बेस्ट फ्रेंडबरोबर लग्न केलं होतं. ७-८ वर्षे आम्ही एकत्र होतो. आयुष्य खूप सुंदर होतं. चढ उतार येत असतात, पण कुठेतरी आपण दुरावले जातो. प्रत्येकवेळी आपण जोडलेले राहू शकत नाही. कधी कधी वैचारिक मतभेद होतात, पण ते व्हायला लागलं तेव्हाच आम्ही ठरवलं की आपली मैत्रीच इतकी महत्त्वाची आहे की कुठल्याही गोष्टीमुळे त्यावर परिणाम व्हायला नको.”
राकेश घटस्फोटाबद्दल पुढे म्हणाला, “आम्ही वेळेत निर्णय घेण्याला प्राधान्य दिलं. जर तुझ्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीच्या येण्याची किंवा माझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती येण्याची शक्यता असेल तर त्याला संधी देऊयात. आम्ही ७ वर्षे एकत्र राहिलो. आम्ही खूप समजुतदारपणे हा निर्णय घेतला. एकमेकांना दोष दिला नाही. लग्न दोन व्यक्ती त्यांची विचारधारा जुळली आणि त्यांना हवं असेल तर करतात. काही लोक मुलांसाठी वगैरे ते टिकवतात पण आमच्या बाबातीत तशी गोष्ट नव्हती.”
पालकत्वाबद्दल राकेश काय म्हणाला?
राकेश पुढे लग्नानंतर मुलांचा विचार का केला नाही यामागचं कारण सांगत म्हणाला, “आम्ही आमच्या कामात इतके व्यग्र होतो आणि लग्न झालं तेव्हा दोघेही करिअच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होतो. आम्ही दोघेच होतो. कौटुंबिक पाठिंबा वैगेरे नव्हता. त्यामुळे आम्ही मुलांचा विचार करू शकत नव्हतो. कारण त्यांना वाढवणार कोण? कारण – एक तर तिला तिचं करिअर सोडून घरी बसावं लागेल किंवा मला ते करावं लागेल आणि दुसऱ्यांकडे मुलांना सोडणं ती संकल्पनाच आम्हाला पटली नाही. त्यामुळे आम्ही एकमताने हा निर्णय घेतलेला की आता हे नको. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, पण त्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला एकत्र राहणंही शक्य नाहीये. मग तेव्हा आम्ही मित्र-मैत्रीण म्हणून राहण्याचा निर्णय घेतला.”
