Tanvi Kolte and Raqesh Bapat Fight: बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील समीकरणे कधी बदलतील हे सांगता येत नाही. कोणत्या तरी टास्कमध्ये किंवा समोरच्या वक्तव्यामुळे मने दुखावली जातात आणि स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळतात. मित्रही शत्रू झाल्याचे गेल्या अनेक सीझनमध्ये पाहायला मिळाले आहे.
आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्येदेखील मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तन्वी कोलते व राकेश बापटमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“अकलेचा कांदा…”
कलर्स मराठी सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, बिग बॉसने स्पर्धकांना एक टास्क दिला आहे. डेंजर कीपासून वाचण्यासाठी सदस्यांचे तंतोतंत प्रयत्न, असे ऐकायला मिळत आहे. त्यानंतर राकेश तन्वीला धरून ठेवतो. त्यानंतर त्यांच्यात भांडण पाहायला मिळते. तन्वी, “सोड ना आरबी, हेल्दी गेम खेळ”, असे म्हणताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तन्वी राकेशला म्हणते, “अकलेचा कांदा, नासका झालेला कांदा”, असे म्हणताना दिसत आहे. त्यावर राकेश तिला गप्प राहा, असे म्हणताना दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, ‘टास्कमध्ये होणार राकेश आणि तन्वीमध्ये घमासान भांडण’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी म्हणाले…
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “तन्वीचा रुचिता मोड ऑन”, “आता तन्वीला बाहेर काढण्याची वेळ आली आहे”, “खरी तन्वी बाहेर येत आहे”, “तन्वीला १०० वोट दिले याचा आता पश्चात्ताप होत आहे”, “तन्वी चांगले खेळत आहे”, “तन्वीला सांगितलं आहे की, आता तू रुचिता बनायचं आहेस”, “तन्वी उत्तम आहे”, “याआधी विशालने किती वेळा टास्कमध्ये तिला ओढले, खेचले ते चालते का? तन्वीला आता राकेशने केले, तर नाही चालत का? तूच म्हणाली होतीस की, मुलगा मुलगी, असे टास्कमध्ये आणत नाही. मग आता काय झालं?”, “तन्वीला विशालनं काही केलं तरी चालतं”, “काटा फुटला”, “अंगाला हात लावल्यावर राग येणारच”, अशा संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत.






आता नेमकं काय घडलं आहे ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राकेश, तन्वी, प्रभू व दीपाली हे सदस्य एकत्र खेळत होते. एकाच ग्रुपमध्ये होते. त्यांनी त्यांच्या ग्रुपला ‘काटा गँग’, असे नाव दिले आहे. आता त्यांच्यात वाद निर्माण होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर या भांडणाबद्दल बोलले जाणार का, हेही पाहणे उत्सुकतेचे आहे.
