Raqesh Bapat shares post: मराठमोळा अभिनेता राकेश बापट हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याने हिंदी, मराठी सिनेसृष्टीत, तसेच मालिकांतही काम केले आहे. ‘सात फेरे – सलोनी का सफर’ या शोमधून त्याला वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मर्यादा : लेकिन कब तक?, होंगे जुदा ना हम, ये हैं आशिकी, इश्क में मरजावा अशा अनेक मालिकांत त्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या.

राकेश बापट ‘बिग बॉस ओटीटी’, बिग बॉस मराठी ६, बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. २०२४ मध्ये नवरी मिळे हिटलरला या झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या मालिकेत त्याने एजे ऊर्फ अभिराम जहागीरदार ही प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, या सगळ्याआधी राकेशला एका सिनेमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

राकेश बापटने शेअर केली पोस्ट

२००१ ला तुम बिन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात राकेश बापट प्रमुख भूमिकेत होता. आता या सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने राकेशने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने लिहिले, “२५ वर्षांचा प्रवास, एक स्वप्न आणि असंख्य आठवणी.”

पुढे त्याने लिहिले, “लोकांना यश आणि प्रसिद्धी आठवते; पण मला असंख्य ऑडिशन्स, प्रतीक्षा, अनिश्चितता, अपयश, प्रत्येक वेळी नव्या उमेदीनं पुन्हा उभं राहणं, या प्रवासात जुळलेली नाती, मिळालेलं यश आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर ठेवलेला अढळ विश्वास आठवतो. २००१ मध्ये ‘तुम बिन’पासून सुरू झालेला हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी फक्त करिअर नव्हतं. तो माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा शिक्षक होता.”

शेवटी त्याने लिहिले, “आजही हा प्रवास तितक्याच उत्साहानं सुरू आहे. मनात कृतज्ञतेची भावना, प्रत्येक नव्या आव्हानाला सामोरं जाण्याची जिद्द कायम आहे.”

राकेश बापटच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

राकेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तू अजूनही आमचा हीरो आहेस.” दुसऱ्या एकाने लिहिले, “अभिनंदन! खरंच अविस्मरणीय चित्रपट होता.” आणखी एकाने लिहिले, “उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. विशेषत: अमरचं पात्र बालपणातील आठवणी जाग्या करतं.” तसेच अनेकांनी हार्ट इमोजीही शेअर केल्या आहेत.

राकेश बापटने तुम बिन या सिनेमाबरोबरच ‘कोई मेरे दिल में है’, ‘हिरोईन’, ‘वृंदावन’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा सिनेमांतही काम केले आहे. आता आगामी काळात राकेश कोणत्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.