बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून राकेश बापटला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ चित्रपटातून राकेशने अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. राकेशने अनेक रिअ‍ॅलिटी शो सुद्धा गाजवले आहेत. नुकताच तो ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा उपविजेता ठरला. या संपूर्ण शंभर दिवसांच्या प्रवासात राकेशला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला.

राकेशने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याच्या बहिणीने राकेश ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याच्या लग्नाबद्दल काय अफवा उडालेली याबद्दलचा किस्सा सांगितला. “तुमच्या आयुष्यातील अशी एक गोष्ट जी तुम्हाला थेट बातमी वाचून समजली होती…अन्यथा नेमकं काय घडलंय याची तुम्हाला कल्पनाच नव्हती, ती गोष्ट कोणती?” हा प्रश्न ऐकताच क्षणी राकेशच्या बहीण शीतल बापट हसु लागल्या.

शीतल यावर म्हणाल्या, “मी परवाच त्याला अशी एक बातमी दाखवली…मध्ये एक Reel व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत होता. त्या व्हिडीओमध्ये राकेश बापट आणि तेजश्री प्रधान लवकरच मे मध्ये लग्न करणार असं सांगितलं जात होतं, आणि तेव्हा राकेश ‘बिग बॉस’मध्ये होता. माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे मला तो व्हिडीओ पाठवत होत्या, ‘अगं आता ही कोणती सून?’ पण, या दोघांचा काहीच संबंध नाहीये. लोक उगाच काहीतरी चर्चा सुरू करतात..बरं त्या व्हिडीओमध्ये लग्नाची तारीख वगैरे सगळं जाहीर केलं होतं. मुळात असं काहीच घडलंच नव्हतं. काही-काही नातेवाईकांनी माझ्या आईला सुद्धा फोन केले. ‘अगं ही बातमी खरीये का? असेल तर मग आवडेलच आम्हाला…’ म्हटलं असं काहीच नाहीये.”

तर राकेश सांगतो, “मी तेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात होतो आणि बाहेर हे सगळं सुरूये याची मला काहीच कल्पना नव्हती. बातमी पाहिल्यावर माझं असं झालं, अरे हे काय मध्येच सुरू केलंय. कारण शोमध्ये मला काहीच माहिती नव्हतं.”

दरम्यान, राकेश बापटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ही मालिका संपल्यावर राकेशने ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात एन्ट्री घेतली होती. या शोचा तो उपविजेता ठरला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’नंतर राकेश कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून सर्वांच्या भेटीला येणार, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहतेही आतुर झाले आहेत.