Riddhi Dogra on friendship with Raqesh Bapat after divorce: राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या पर्वातील त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राकेश बापट बिग बॉसमध्ये जाण्याअगोदरही विविध कारणांमुळे चर्चेत असायचा. त्याने साकारलेल्या भूमिका, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील तो अनेकदा चर्चेत असायचा.
आता राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोगराने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. तिने त्यांच्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल, तसेच घटस्फोटानंतर त्यांच्यात असलेल्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले आहे.
“आम्ही एकमेकांसाठी जोडीदार म्हणून…”
रिद्धीने काही दिवसांपूर्वीच बालाजी टेलिफिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती राकेश बापटबद्दल म्हणाली, “मी आणि माझा एक्स पती राकेश खूप चांगले मित्र आहोत. आम्ही खरंच खूप चांगले मित्र आहोत. आम्ही घटस्फोट घेतला आणि आम्ही आमची मैत्री वाचवली आहे. आम्ही एकमेकांसाठी जोडीदार म्हणून योग्य नव्हतो. पण, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो. एकमेकांची गुपिते गुपितच ठेवतो. एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो”, असे म्हणत रिद्धीने घटस्फोटानंतर राकेशबरोबर उत्तम मैत्री, त्याच्याबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे सांगितले.
रिद्धी आणि राकेश यांची ‘मर्यादा : लेकिन कब तक’ मालिकेदरम्यान भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी २०११ ला लग्नगाठ बांधली; मात्र २०१९ ला ते वेगळे झाले. दोघांनी विचार करून एकत्रित हा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतरही त्यांच्यात खूप चांगले नाते असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. त्यांच्यातील मैत्री त्यांनी तशीच ठेवली. आजही ते त्यांची मैत्री जपत असल्याचे दिसते. विविध कार्यक्रम, सण, वाढदिवसाच्या निमित्ताने भेटतात. सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. अनेकदा त्यांच्या या मैत्रीची चर्चा रंगते.
रिद्धीच्या कामाबद्दल बोलायचे, तर विविध चित्रपट, टीव्ही मालिका तसेच वेब सीरिज यांमधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिने जवान, एक था टायगर अशा बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, असुर, द मॅरिड वुमन अशा वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. तसेच ती टॉप ५० या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी होणार आहे.
दरम्यान, राकेश बापट त्याच्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकणार का, तसेच शोच्या शेवटपर्यंत तो या शोमध्ये राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

