छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका वाखारकरनं नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. शुभांकर उंब्राणीसह तिचा शुभविवाह पार पडला. याचे खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या लग्नात अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदितासुद्धा रसिकाला शुभाशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

या मालिकेमुळे रसिका घराघरात पोहोचली. त्यानंतर तिची दुसरी ‘अशोक मामा’ मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात मालिकेत रसिका आणि अशोक सराफ यांनी एकत्र काम केलं आहे. रसिकाच्या लग्नाआधीचं पहिलं केळवणदेखील सराफ कुटुंबीयांनी केलं होतं आणि याचा व्हिडीओसुद्धा अभिनेत्रीनं शेअर केला होता. अशातच अशोक सराफ यांनी तिच्या लग्नात तिचं कौतुक करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रसिकाच्या लग्नात ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेतल्या कलाकारांनी हजेरी लावली होती. कांची शिंदेसुद्धा या लग्नाला उपस्थित राहिली होती आणि याचे खास क्षण अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या लग्नात अशोक सराफ यांनी रसिका चांगली मैत्रीण झाल्याचंसुद्धा म्हटलं.

“मला आणि निवेदिताला एक चांगली मैत्रीण मिळाली”

अशोक सराफ म्हणाले, “रसिकाबद्दल मी काय बोलू… गेले १४ महिने आम्ही एकत्र काम करत होतो. अशा फार कमी मुली भेटतात, कमी कलाकार भेटतात, जे फक्त आपल्या कामावर लक्ष ठेवतात. रसिका ही त्यापैकी एक आहे. कामाशिवाय तिचं इतर कुठेही लक्ष नसतं. मुळात मी केलेला विनोद तिला कळायचा हो… माझ्या दृष्टीनं ही खूप मोठी गोष्ट आहे. रसिकाला मी बोललेला प्रत्येक शब्द कळायचा. मी एखादी सूचना केली, तर ती ऐकायची आणि ते करून बघायची. मी करते तेच बरोबर, हे तिनं कधी केलं नाही. केलेल्या सूचना ती ऐकायची. यामुळे १४ महिन्यात तिच्या अभिनय कारकिर्दीत भर पडली असं मला वाटतं. रसिकाच्या निमित्तानं मला आणि निवेदिताला एक चांगली मैत्रीण मिळालीय.”

यानंतर ते म्हणाले, “गेले १४ महिने आम्ही केलेलं एकत्र काम मी कधीच विसरू शकत नाही. ते १४ महिने फार आनंदाचे गेले आणि यापुढचे महिने शुभांकरचेसुद्धा आनंदात जातील असं मला वाटतं. दोघांना बघितल्यानंतर मी ओळखलं होतं की, दोघे एकमेकांना पूरक आहेत. दोघे एकमेकांना सांभाळून घेतील. दोघांना त्यांच्या या नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. मला क्वचितच काही माणसं आवडतात, त्यापैकी रसिका-शुभांकर हे दोघे आहेत.”

दरम्यान, रसिकानं लग्नात हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तर पती शुभांकरनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टवरील कमेंट्समध्ये रसिकाच्या चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.